सावंतवाडीत रविवारी श्री दुर्गामाता दौडीचा प्रारंभ
शिवतीर्थ येथे प्रतिमापूजन, शस्त्रपूजन व प्रेरणामंत्राने होणार शुभारंभ
सावंतवाडी | प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जागवणारी आणि हिंदू समाजात राष्ट्रभक्ती व धर्मजागृतीची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता दौड रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सावंतवाडीत आयोजित करण्यात आली आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत होणाऱ्या या दौडीचा प्रारंभ सायंकाळी ४.३० वाजता शिवतीर्थ (छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक, माणिकचौक) येथे होणार आहे.
शिवतीर्थ येथे प्रतिमापूजन, शस्त्रपूजन आणि प्रेरणामंत्र पठण करून दौडीला सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रभक्तीपर गीतांच्या गजरात दौड श्री हनुमान मंदिर (चार गदा), गाडीअड्डा येथे पोहोचेल. तेथे श्री दुर्गामातेचे दर्शन घेतल्यानंतर दौड पुन्हा शिवतीर्थ येथे येईल. याठिकाणी ध्येयमंत्र पठणाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या दौडीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
