You are currently viewing चराठा-कारिवडे धरणासाठी विशेष निधीची मागणी

चराठा-कारिवडे धरणासाठी विशेष निधीची मागणी

चराठा-कारिवडे धरणासाठी विशेष निधीची मागणी

सावंतवाडीचा भविष्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चराठा-कारिवडे धरण तातडीने कार्यान्वित करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची मागणी

सावंतवाडी :

सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी चराठा-कारिवडे सीमेवर शासनाने मंजूर केलेले धरण तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावंतवाडी नगरपालिका हद्दीसह माजगाव, मळगाव, चराठे, कोलगाव, केसरी आदी ग्रामीण भागात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जानेवारीपासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सावंतवाडी शहर व ग्रामीण भागाला कुणकेरी आणि केसरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने भविष्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता मसुरकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
सावंतवाडी शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर चराठा-कारिवडे सीमेवर काही वर्षांपूर्वी नवीन धरण मंजूर करण्यात आले आहे. शासनाने संबंधित जमीनमालकांना योग्य मोबदला देऊन या धरणाचे काम तातडीने सुरू करावे. हे धरण तीन ते चार वर्षांत पूर्ण झाल्यास सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मोठी मदत होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात सावंतवाडी शहर व ग्रामीण भागाला नियमित, मुबलक तसेच २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व अर्थ विभागामार्फत या धरणासाठी विशेष निधीची तरतूद करून प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी राजेंद्र मसुरकर यांनी केली आहे.
या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सावंतवाडीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा