*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका सौ.मानसी भोसेकर लिखित आरोग्यदायी लेख*
*लेकितील आईसाठी*
(भाग दुसरा)
” अन्न हे पूर्ण ब्रह्म ”
अन्न , जेवण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. आपण ज्या प्रांतात राहतो तिथे पिकणारे अन्नधान्य, भाज्या, फळं यांचा समावेश आपल्या स्वयंपाकात केला जातो. यावरून आपल्या स्वयंपाक करण्याच्या पध्दतीत विविधता आढळून येते. बारा कोसावर भाषा बदलते तसचं पदार्थातही विविधता आढळून येते.
बाळंतिणीने काय खावं ? काय खाऊ नये ? याविषयी प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं.
जुनं ते सोनं.
नव ते हिरेमोती.
आपण नव-जुन्याची सांगड घालूया.
आपण रोज जे खातो त्या जेवणाची तीला सवय झालेली असते, ते तीला आवडतं. तेच जेवण द्यावं. ताजं, गरम व सहज पचेल असं जेवण द्यावं. जास्त तिखट, चमचमीत व मसालेदार जेवण देऊ नये पण अगदीच अाळणी पण करू नये. भाजी, आमटी करताना त्यात तिखट, मसाले कमी प्रमाणात घालावे जेणेकरून ते जळजळीत होणार नाही पण रूचकरही होईल. आपल्या मसाल्यातील पदार्थ औषधी गुणधर्माचे आहेत. चयापचय क्रिया वाढवतात, पचनास मदत करतात. जेवणात वातूळ पदार्थाचा वापर करू नये. जेवताना आई आनंदी व खूश रहावी , ते अन्न ग्रहण करून त्याचं व्यवस्थित पचन झालं की ते तिच्या आरोग्यासाठी चांगलं. तीचं आरोग्य चांगलं असलं कि बाळाला सकस व भरपूर दूध मिळतं ,बाळाचं पोेषण चांगलं होतं.
Plenty Of Food for Baby.
अन्न शिजवताना मनात सकारात्मक विचार असावे, देवाचं नामस्मरण करत एखादं आवडतं संगित ऐकत प्रसन्न चित्ताने अन्न शिजवावं. जेवताना आईने सकारात्मक विचार ठेवावे.
हे मला पचेल का?
याचा त्रास तर होणार नाही ना?
असा विचार करू नये. सगळं खावं. सगळं अन्न छान पचेल , माझं आरोग्य छान राहिल , बाळाला पोटभर दूध मिळेल असा विचार करावा. अन्नाला नमस्कार करून तो अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण करावा.
जेवणात भाजी, आमटी, उखळ, भात, पोळी, भाकरी, कोशिंबीर,चटणी, ताक यांचा समावेश करावा. भाकरी आवडत असल्यास भाकरी खावी.
फळभाज्यांमध्ये दूधी, तांबडाभोपळा, घोसाळी, दोडकी, पडवळ, तोंडली ,भेंडी , फरसबी, गवार इ.इ. पालेभाज्या मेथी, शेपू, पालक, चवळी, लाल माठ, इ.इ. मोडआलेल्या कडधान्यांच्या उसळी, कडधान्यांची आमटी, कोशिंबीर, ताजं ताक वगैरे घ्यावं.
सकाळी नाष्टा करावा. त्यासाठी,खीर, पेज, कांजी, पोहे, उपमा, शिरा, सांजा, उकडपेंडी, घावन, थलिपीठ तर कधी गरम पोळीवर गुळ तूप घालून खावी. कधी भाजीपोळी, चटणी पोळी जे आवडेल ते खावं. गरम भाकरी तूप व चटणी किंवा भाजी. भाज्याघालून केलेलं थालिपीठ, पराठा यापैकी एक पदार्थ.
आता आपण काही पाककृती पाहूया.
१) आल्याची वडी
साहित्य :१ वाटी आल्याचा रस
३ वाट्या साखर
३वाट्या खोवलेला नारळ
१वाटी दूधाची साय (मलई )
१/२ वाटी तूप
वेलची पूड
कृती : प्रथम मिक्सरमध्ये आल्याचे तुकडे व पाणी घालून वाटावे .गाळून आल्याचा रस काढावा .
जाड कढईत वरील सर्व पदार्थ एकत्र करून आटवावे .मिश्रण घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या ताटात ओतून थापावे .लहान लहान वड्या कापाव्या .
टीप : आल्याचा रस काढल्यावर उरलेलं आलं( चोथा ) फ्रीजमध्ये ठेवून रोज चहात ,भाजी किंवा आमटीत घालाव.
२) खसखस खीर
साहित्य : १चमचा खसखस
१चमचा बदामपूड
१चमचा खारीकपूड
१ ते दीड कप दूध
साखर
वेलचीपूड ,जायफळपूड
कृती: रात्री खसखस व २बदाम पाण्यात भिजत घालावे . सकाळी मिक्सरमध्ये वाटावे .एका भांड्यात थोड तूप घालून त्यावर खसखस परतून त्यात दूध साखर ,खारीकपूड घालून उकळावे .त्यात वेलची,जायफळपूड घालावी . खीर तयार .
खसखस मिक्सरमध्ये बारीक वाटली जात नाही म्हणून खसखस कोरडीच भाजून मिक्सरमध्ये वाटून ठेवावी म्हणजे बारीक वाटली जाते व रोजचा वेळ पण वाचतो .
बदामाचीपूड केली तरी चालतं.
३) कणकेचा शिरा
साहित्य :रवाळ दळलेली कणिक (गव्हाचे पीठ)
तूप
गूळ
काजू ,बदाम ,पिस्ता भरड
कृती:कढईत कणिक घालून कोरडी भाजावी .चांगली भाजल्यावर त्यात तूप घालून परत थोडी भाजून गरम पाणी घालावे .झाकण घालून वाफ काढावी .नंतर त्यात गूळ घालून वाफ काढावी .आवडीप्रमाणे काजू ,बदाम भरड घालावी .शिरा करताना त्यात पाण्याबरोबर थोडं दूध घालावं .खायला देताना त्यात थोडं तूप घालावं .
टीप: कणिक रवाळ दळावी .कोरडी ,मंद आचेवर भाजावी म्हणजे शिरा खमंग अन मोकळा होतो .चिकट होत नाही .
कणिक आधी भाजून ठेवली तर घाई होत नाही व रोजचा वेळ वाचतो .
४) उकडपेंडी
साहित्य: १ वाटी रवाळ कणिक
१ वाटी गोडसर ताक आवडीप्रमाणे,शेंगदाणे,मीठ,साखर,तिखट फोडणीसाठी : तेल, मोहरी, जीरं, हिंग, हळद ,मेथीदाणे ,मिरची ,कढीलिंब , सजावटीसाठी कोथिंबीर ,खोवलेला ,नारळ कृती : प्रथम जाड कढईत मंद आचेवर कोरडी कणिक भाजावी .नंतर कढईत तेल घालून शेंगदाणे तळून घ्यावे . तेलात मोहरी ,जीरं मेथीदाणे घालावे .ते तडतडल्यावर मिरची कढिलिंब ,हळद व हिंग घालावा .नंतर त्यात भाजलेली कणिक चवीप्रमाणे मीठ तिखट व साखर घालावी .नंतर ताक व पाणी घालून वाफ काढावी .
ताक व पाणी घालताना थोडं थोडं घालावं झाकण ठेवून वाफ काढावी .एकदम घातल्यास गोळे होतील म्हणून अंदाज घेऊन घालावे .
नंतर त्यावर दाणे ,नारळ व कोथिंबीर घालून सजवावे .
फोडणीत लसणाचे वआल्याचे बारीक तुकडे घातले तर छान लागतात पण काहींना लसूणआवडत नाही (चालत नाही ). आपल्या आवडीप्रमाणे करावे .
५) तांदळाची उकड
साहित्य :तांदळीची पिठी
बाकीचे साहित्य व कृती वरील प्रमाणे
याचप्रमाणेज्वारीचे पीठ किंवा नाचणीचे पीठ वापरून उकड करता येते .
रोज रोज तेच ते खाऊन कंटाळा येतो म्हणून वेगळी पीठं वापरून “रूचीपालट ” करावा .
६) घावन
४वाट्या तांदूळ १वाटी मूगडाळ धुवून वाळवून घ्यावे .त्यात चमचाभर मेथीदाणे घालून दळावे .
हे पीठ तयार करून ठेवावे. म्हणजे वेळेला पटकन घावन करता येते .
साहित्य : घावनाचे पीठ, मीठ ,कोथिंबीर ठेचलेलं आलं नारळ साखर
कृती :पाणी घालून पीठ भिजवावे. तेल किंवा तूपावर घावन घालून चटणी बरोबर खायला द्यावे .
७) गुळपापडीच्या वड्या
साहित्य: १ वाटी रवाळ कणिक
१ वाटी गुळ
आवश्यकेनुसार तूप
१/२ वाटी खोबऱ्याचा किस
वेलची किंवा जायफळ पूड
काजू, बदाम, पिस्ता
कृती : प्रथम जाड कढईत खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा. थंड झाल्यावर हाताने कुसकरून बारीक करावा. नंतर कढईत तूप घालून मंद आचेवर रवाळ कणिक भाजावी. (बेसन भाजतो तसे )गॅस बंद करून कणकेत खोबऱ्याचा किस, गूळ ,काजू,बदाम,पिस्त्याची पूड, व वेलची, जायफळाची पूड घालून नीट कालवावे.
तूप लावलेल्या परातीत हे मिश्रण ओतून थापावे. गरम असतांना वड्या कापाव्या. थंड झाल्यावर काढून बंद झाकणाच्या डब्यात ठेवाव्या.
८) खसखशीची भाजी /आमटी
साहित्य : भिजवलेली खसखस पाव वाटी
खोबऱ्याचा किस किंवा खोवलेला
नारळ २ ते ३ चमचे
भाजलेल्या तीळाचे कूट २चमचे.
बारीक चिरलेला कांदा १
आलं,लसूण पेस्ट अर्धा चमचा
धणेजीरेपूड
मीठ व गुळ चवीप्रमाणे
फोडणीसाठी साहित्य : तेल, मोहरी, जीरं,
हिंग, हळद, तिखट,
हिरवी मिरची, कढिपत्ता
कोथिंबीर.
कृती : प्रथम भिजवलेली खसखस वाटावी. कढईत तेल, मोहरी ,जीरं घालून फोडणी करावी. त्यात आलं, लसूण पेस्ट घालून परतावी. त्यात कांदा घालून परतावा.
नंतर कढीपत्ता व मिरचीचे तुकडे घालावे. त्यात वाटलेली खसखस, खोबऱ्याचा किस किंवा नारळ, तीळकूट तिखट, धणेजीरेपूड घालून परतावे. पाणी घालावे. चवीप्रमीणे मीठ व गुळ
घालावा. एक उकळी काढावी. नंतर नारळ व कोथिंबीरीने सजवावे.
टीप : पूर्वी खसखस पाट्यावर वाटत असत. आता मिक्सरमध्ये ती नीट वाटली जात नाही. म्हणून ती किंचित भाजून कोरडीचं वाटावी नंतर पाणी घालून वाटावी. किंवा खलबत्यात कुटावी .
९) मेथ्यांची उसळ
साहित्य: १/२ वाटीमोड आलेले मेथीदाणे.
१वाटी खोवलेला नारळ.
१ कांदा
२हिरव्या मिरच्या(कमी तिखट)
६ ते७ कढिपत्याची पाने
आल्याचे तुकडे
२ पाकळ्या लसूण
१/२ वाटी कोथिंबीर
१चमचा धणेजीरेपूड
फोडणीसाठी : तेल,मोहरी,जीरे,हळद
हिंग तिखट.
मीठ व गूळ चवीप्रमाणे.
कृती : प्रथम मेथीदाणे पाण्यात भिजवावे.
४ते५ तासानंतर त्यातील पाणी काढून एका
पातळ कापडात बांधावे. दुसऱ्यादिवशी त्याला
छान मोड येतात.
आता कढईत तेल,मोहरी,जीरं घालून फोडणी करावी. त्यात लसूण, आलं, कढीपत्ता
मिरचीचे तुकडे घालावे. नंतर कांदा हिंग व हळद घालून परतावे. त्यात मेथीदाणे घालून परतावे. थोडं पाणी घालून वाफ काढावी.
त्यात धणेजीरेपूड, चवीप्रमाणे तिखट,मीठ व गूळ घालावा. एक वाफ काढावी. नंतर (ओला)
नारळाचा चव व कोथिंबीर घालावी.
टिप : लसूण ,कांदा व गूळ हवं असल्यास व
आवडत असल्यास घालावे.
ही मेथीची उसळ असल्याने ती थोडी कडू
लागते. पण मोड आल्याने त्याचा कडूपणा
कमी होतो. नारळाने व कांद्याने गोडसर लागते.
मेथी गरम असल्याने नारळ व कोथिंबीर
भरपूर वापरावी.
१०) मेथीची खिचडी
साहित्य : १वाटी तांदूळ
१/२ वाटी मूगडाळ किंवा
तूरडाळ
पाव वाटी मोड आलेली
मेथीदाणे.
गाजर व इतर भाज्या.
बाकी साहित्य व कृती नेहमीच्या खिचडी प्रमाणे.
बाळंतिणीला मेथी खायला द्यावी. मोड आलेली
मेथी रोज भाजी व आमटीत (फोडणी करताना
८ते १० दाणे) घालावे.
धन्यवाद.
सौ. मानसी भोसेकर.
©🖊सौ. मानसी शरश्चंद्र भोसेकर.
(क्रमश:)
