परवा नागपूरला एका भव्य कार्यक्रमांमध्ये आमचे सन्मित्र व वरुड नगरीचे भूषण श्री गिरीधर देशमुख यांचा स्व अनिलकुमार पञकारीता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वरुडवासीयांबरोबर श्री गिरीधरभाऊ यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानी मध्ये आणि तेही मान्यवर अतिथींच्या हस्ते गिरीधर भाऊंचा सत्कार होणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेणे होय.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे जर आपण एक नजर फिरवली तर हे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याचे जाणवते. अत्र तत्र सर्वत्र हे समीकरण त्यांना तंतोतंत लागू पडते. समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या मुक्त संचार आहे. सक्रिय सहभाग आहे. जे जे आपलासी ठावे .ते ते इतरांना सांगावे. शहाणे करून सोडावे. सकळजन .या न्यायाने ते सर्वत्र वावरत असतात.
माझा त्यांचा घनिष्ठ परिचय आमच्या कवियत्री प्रा. कविता डवरे व त्यांचे यजमान डॉ. लाहुडकर यांच्यामुळे आला आणि तो आता पक्का दृढ झाला आहे. कॅलिफोर्निया टाइम्स हे गिरीधर भाऊंचे अपत्य. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी या अपत्याची दखल घेतली. फारसा व्यापारी दृष्टिकोन न ठेवता त्यांनी एक छंद म्हणून कॅलिफोर्निया टाइम्सला चांगले जिल्हा पातळीवर विकसित केले आहे आणि त्यांचा वाचक वर्गही प्रचंड आहे राज्यात व अगदी परदेशात देखील.
वरुड शहरातील कोणतीही चळवळ घ्या .त्यामध्ये गिरीधर भाऊ नाहीत असं होणारच नाही. साहित्य संमेलन असू द्या ,योग संमेलन असू द्या ,वृक्षमित्र संमेलन असू द्या, गायत्री यज्ञ असू द्या ,नाटक असू द्या ,कवी संमेलन असू द्या, महाविद्यालयातला कार्यक्रम असू द्या किंवा शाळेमधला कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये गिरीधर भाऊ आहेतच .कारण घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी या नात्याने त्यांनी वरूड या शहराचे संगोपन व संवर्धन केलेले आहे.
खासदार डॉ. अनिल बोंडे आमदार असल्यापासून माझ्या या मतदारसंघात किती तरी चकरा झाल्या. वरुडला आले की गिरीधर भाऊला भेटलो नाही असे कधी झाले नाही. मी फोन केला की गिरीधरभाऊ हजर .हा गिरधर भाऊ यांच्या मनाचा मोठेपणा आहे .आमच्या सर्व कार्याला ते व्यापक प्रसिद्धी देतात. विशेष म्हणजे त्यांनी मला आजपर्यंत एक रुपयाची जाहिरात मागितली नाही. तीच गोष्ट खासदार अनिल बोंडे साहेबांची. खरं म्हणजे आमदार कृषी मंत्री खासदार अनिल बोंडे हे त्यांचे मित्र असताना ते त्यांच्याकडून भरपूर जाहिराती मागू शकले असते पण तो गिरीधर भाऊंचा स्वभाव नाही. स्वतःहून दिले तर घ्यायची. आग्रह करायचा नाही .याचा मला अनुभव आमदार अनिल बोंडे यांच्या निवडणुकीतही आला. गिरीधर भाऊंनी कधी हट्ट धरला नाही. तो त्यांचा स्वभावच नाही.
आम्ही वरुडला1994 यावर्षी बहुजन साहित्य संमेलन घेतले ते खऱ्या अर्थाने गिरीधर देशमुख यांच्याच पुढाकाराने. स्वागताध्यक्ष माजी मंत्री व आताचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख हे होते तर प्राचार्य व नंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू झालेले डॉ.सुधीर पाटील यांच्यासारखे अनेक मान्यवर कार्यकारणीमध्ये लाभले होते आणि एक उत्कृष्ट संमेलन कसे असावे याचा आदर्श त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवला. याचे बरेचसे श्रेय गिरीधर भाऊंना दिले तर ते वावगे होणार नाही इतके परिश्रम त्यांनी या संमेलनासाठी घेतले.
विनयशीलता हा गिरीधर भाऊंच्या स्वभावाचा एक महत्त्वपूर्ण गुण आहे .मी त्यांना आजपर्यंत कोणावर रागावलेले पाहिले नाही. सर्वांशी हसतमुख चेहऱ्याने सामोरे जाणे हा त्यांचा स्वभावधर्म .तो बदलणे शक्यच नाही. मी पत्रकार आहे हा अहंकार त्यांना कधीही शिवला नाही आणि शिवणारही नाही.
वरुडच्या आरोग्यासाठी राबणारा हा माणूस खरं म्हणजे वरूडसाठी देवदूतच आहे. सकाळी पाच वाजल्यापासून वरुडला योगासनाचे वर्ग सुरू होतात. गिरीधरभाऊ स्वतः त्यात तरबेज आहेत. त्यांनी वरुड च्या विविध भागात योग वर्गांना चालना दिली आहे. आणि म्हणून वरुडच्या ह्या नागरिकांच्या रक्तवाहिन्या सशक्त झालेल्या आहेत असे विधान केल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही.
स्वतःबरोबर इतरांचा विचार करणारा हा माणूस म्हणूनच परोपकारी यास शब्दाला न्याय देणारा आहे.
आमच्या दुसऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्याचा उपक्रम गिरीधर भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविला आहे. वरुडला ऑरेंज सिटी असो जागृत कन्या असो किंवा जागृत प्राथमिक असो किंवा कळमकर सरांची शाळा असो माझा कार्यक्रम असला की गिरिधर भाऊ त्यात नाहीत असे कधीच झाले नाही आणि होणारही नाही .इतके त्यांचे आमचे नाते आहे आणि ते अंतिम श्वासापर्यंत कायम राहणार आहे.
वरुडवासियांनी एकत्र येऊन या परोपकारी समाजाभिमुख पत्रकार मित्राचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. मी कर्नाटक राज्यात असल्यामुळे या समारंभाला उपस्थित राहू शकणार नाही. पण मी तनाने जरी या कार्यक्रमाला उपस्थित नसलो तरी मनाने मात्र मी गिरीधर भाऊ बरोबर होतो आहे आणि राहणारही आहे. शुभेच्छा..!
*प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे*
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प*
9890967003
