You are currently viewing पाळणेकोंड धरणाचे पाणी सोडल्याने सावंतवाडीकरांसमोर पाणीटंचाईचे संकट

पाळणेकोंड धरणाचे पाणी सोडल्याने सावंतवाडीकरांसमोर पाणीटंचाईचे संकट

पाण्याची पातळी ८ ते १० फूट खाली; उन्हाळ्यात सावंतवाडीकरांचे हाल होण्याची शक्यता

संजू परब यांचा आरोप; उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी

सावंतवाडी : कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणातील पाणी सावंतवाडी नगर परिषदेने सोडल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी सुमारे ८ ते १० फूटांनी खाली गेल्याचे चित्र आहे. आगामी काळात पावसाची शक्यता कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन न केल्यास उन्हाळ्यात सावंतवाडी शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा जपण्याबरोबरच भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. सावंतवाडी नगर परिषद प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, अशी टीका नागरिकांमधून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या कामकाजावर सत्ताधाऱ्यांचे अपेक्षित नियंत्रण नसल्याने शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे. नगरपालिका प्रभावीपणे चालविण्याबाबत सत्ताधाऱ्यांना स्वारस्य नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे परब यांनी म्हटले.

उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार असल्याने आतापासूनच पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा उपलब्ध पाणीसाठा कमी पडून सावंतवाडीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा