You are currently viewing कोकण पर्यटनाला तंत्रज्ञानाची नवी दिशा; जागतिक पर्यटन दिनी विनामूल्य वेब पोर्टलचा शुभारंभ

कोकण पर्यटनाला तंत्रज्ञानाची नवी दिशा; जागतिक पर्यटन दिनी विनामूल्य वेब पोर्टलचा शुभारंभ

कोकण पर्यटनाला तंत्रज्ञानाची नवी दिशा; जागतिक पर्यटन दिनी विनामूल्य वेब पोर्टलचा शुभारंभ

AI आणि डिजिटल अजेंड्याच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला जागतिक व्यासपीठावर नेण्याचा पर्यटन व्यावसायिक महासंघाचा प्रयत्न : विष्णू मोंडकर

मालवण

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून यंदा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेने “Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism” ही मध्यवर्ती संकल्पना जाहीर केली आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील पर्यटनाला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून https://vmtravelmart.in हे विनामूल्य वेब पोर्टल सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक हॉटेल, लॉजिंग, होमस्टे, ॲग्रो-टुरिझम तसेच लॉजिंग-बोर्डिंग व्यावसायिकांना या पोर्टलवर एकत्र आणण्यात येणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांना सिंधुदुर्ग व कोकणातील पर्यटनस्थळे, निवास व्यवस्था, स्थानिक संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन सेवांची माहिती एकाच ठिकाणी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आजचा पर्यटक प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी मोबाईल, डिजिटल नकाशे, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून माहिती घेतो. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यावसायिकांनी डिजिटल आणि AI-साक्षर होणे ही काळाची गरज बनली आहे. सिंधुदुर्गला राज्यातील पहिला AI जिल्हा बनविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवरही काम सुरू असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.

या पोर्टलवर पर्यटन व्यावसायिकांना पूर्णपणे मोफत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना अडचण येणाऱ्या व्यावसायिकांसाठी महासंघाने विशेष सुविधा उपलब्ध केली असून, 82751 06375 या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्यवसायाचे नाव पाठविल्यास महासंघाचे प्रतिनिधी संपर्क साधून नोंदणी करून देतील.

कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि AIची जोड

कोकणातील अनेक पर्यटनस्थळे देशभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात कंटेंट क्रिएटर्स, सोशल मीडिया रील्स आणि यूट्यूब व्हिडिओंची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या क्षेत्रातील संस्था व व्यक्तींना एकत्र आणून स्थानिक होमस्टे, खाद्यव्यवसाय आणि छोट्या पर्यटन व्यावसायिकांना डिजिटल माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन महासंघाने केले आहे.
मालवणी खाद्यसंस्कृती, दशावतार लोककला, आंबा-काजू बागा, पारंपरिक जीवनशैली आणि निसर्ग पर्यटनाचे अनुभव AIच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये पर्यटकांपर्यंत पोहोचविता येतील. ‘AI + स्थानिक ज्ञान’ या संकल्पनेतून स्थानिक युवकांना डिजिटल टुरिझम गाईड म्हणूनही विकसित करता येईल. AI हे मानवाची जागा घेण्यासाठी नसून काम अधिक वेगवान, अचूक आणि प्रभावी करण्यासाठी उपयोगी ठरणारे तंत्रज्ञान असल्याचे मोंडकर यांनी स्पष्ट केले.

पर्यटन संचालन कोकण विभागाच्या समन्वयाने पर्यटन

व्यावसायिक महासंघ काम करणार असून, पर्यटन वाढीसोबतच निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक आहे. स्थानिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, मार्गदर्शक प्रणाली आणि पर्यटन शिस्त यासाठीही स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर महासंघ प्रयत्न करणार असल्याचे विष्णू मोंडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा