You are currently viewing असलदे येथे दुचाकीवर झाड कोसळून युवकाचा जागीच मृत्यू

असलदे येथे दुचाकीवर झाड कोसळून युवकाचा जागीच मृत्यू

असलदे येथे दुचाकीवर झाड कोसळून युवकाचा जागीच मृत्यू

उपचारासाठी मित्र रुग्णालयात दाखल; धोकादायक झाड हटविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

कणकवली :

असलदे येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन युवकांच्या अंगावर अचानक मोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. जखमी युवकाला कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रतीक वाळके व त्यांचा मित्र अॅक्टिव्हा दुचाकीवरून नांदगाव ते असलदे मधलीवाडी या मार्गाने जात असताना रस्त्यालगत असलेले जुने झाड अचानक त्यांच्या दुचाकीवर कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांखाली दोघेही अडकले. घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या बाजूला करून दोघांना बाहेर काढले. मात्र, प्रतीक वाळके यांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी मित्राला तातडीने कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कणकवली-देवगड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दरम्यान, नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, या कामादरम्यान रस्त्यालगतची अनेक झाडे हटविण्यात आली आहेत. असलदे येथील हे जुने झाड धोकादायक असल्याने ते हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीकडून झाड हटविण्यास दिरंगाई झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला.
या पार्श्वभूमीवर मृत प्रतीक वाळके यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, तसेच ठेकेदार कंपनीनेही आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धोकादायक झाडाबाबत पूर्वसूचना देऊनही दुर्लक्ष झाले असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
या घटनेमुळे रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा