You are currently viewing फोंडाघाट मेनरोडवरील खड्डे बुजवले; मात्र एस.टी. स्टँडमागील रस्त्याच्या डागडुजीचे काय?

फोंडाघाट मेनरोडवरील खड्डे बुजवले; मात्र एस.टी. स्टँडमागील रस्त्याच्या डागडुजीचे काय?

फोंडाघाट मेनरोडवरील खड्डे बुजवले; मात्र एस.टी. स्टँडमागील रस्त्याच्या डागडुजीचे काय?

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा सवाल; वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

फोंडाघाट :

फोंडाघाट मेनरोडवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी एस.टी. स्टँडच्या मागील बाजूच्या रस्त्याची दुरवस्था अद्याप कायम असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

एस.टी. स्टँडमागील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या काळात फोंडाघाटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची वर्दळ वाढते. गणपती आगमन आणि विसर्जनाच्या काळात याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे उत्सवापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मेनरोडवरील खड्डे बुजविण्याप्रमाणेच एस.टी. स्टँडमागील रस्त्याचीही तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची आवश्यक डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

गणपती उत्सवाच्या आधी प्रशासन या रस्त्याची दखल घेणार का? असा सवाल आता फोंडाघाटवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.आज अजित नाडकर्णी सामाजिक कार्यकर्ते माजी ग्राम पंचायत सदस्य यांनी पाहणी केली.आणि संबंधीत ठेकेदाराला समज दिली तो रस्ता आमचेकडे नाही तरी वरिष्ठनी सांगितले तर खड्डे बुजवू म्हणून सांगितले.कारण लहान गाड्या याच रस्त्याने जा ये करत असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा