You are currently viewing अगस्ति विद्यालयात स्कूल बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

अगस्ति विद्यालयात स्कूल बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

अगस्ति विद्यालयात स्कूल बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

विटे, ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार ) :

अगस्ति विद्यालय, अगस्तीनगर येथे विद्यालयावर प्रेम करणाऱ्या दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळासाहेब जाधव (भाऊ), संस्थाध्यक्ष, ग्रामविकास शिक्षण मंडळ होते. यावेळी पोलीस अधिकारी श्री. अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संतोष तुकाराम नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात बाळासाहेब जाधव म्हणाले, “अगस्ति विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्मार्ट टीव्ही, संगणक, इंटरनेट तसेच विविध आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या भौतिक सुविधांचा प्रभावीपणे उपयोग करून आपल्या ज्ञानात आणि गुणवत्तेत वाढ करावी. मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात उतरवावे.”
श्री. अनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत मेहनत, शिस्त व चांगले संस्कार अंगीकारण्याचे आवाहन केले. उपलब्ध शैक्षणिक संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याची भक्कम पायाभरणी करावी, असे त्यांनी सांगितले.
स्कूल बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे बॅग स्वीकारून आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्याबरोबरच त्यांच्या मनात समाजातील दानशूर व्यक्ती आपल्या शिक्षणासाठी सदैव पाठीशी आहेत, हा सकारात्मक भाव निर्माण झाला.
अगस्ति विद्यालयात आधुनिक शैक्षणिक साधनांसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, शाळा आणि समाज यांच्या सहकार्याचा आदर्श या उपक्रमातून निर्माण झाला आहे, असे मुख्याध्यापक श्री. संतोष नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनोदकुमार खाडे सर यांनी केले, तर आभार श्री. विक्रम कबीर सर यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा