महाराष्ट्र आयकॉन २०२६ पुरस्कार विनोद अष्टुळ यांना प्राप्त
सुप्रसिद्ध साप्ताहिक आपली चळवळ व जनसंवाद न्यूज तर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांसाठी महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२६ सन्मान सोहळा सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहामध्ये आयोजित केला होता.
मंचावर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्षा तेजस्विनी कदम, मोहोळ पंचायत समिती सभापती असलम चौधरी, जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरुटे, अरुणा शिवशरण, आपली चळवळ साप्ताहिकाचे संपादक गोरक्ष गायकवाड, जनसंवाद न्यूजचे संपादक कैलास रणदिवे, आपली चळवळचे कार्यकारी संपादक पितांबर धिवार तसेच सोलापूर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विनोद अष्टुळ यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी गेल्या चौदा वर्षापासून सातत्याने नाबाद दोनशे अठ्ठावीस कार्यक्रम घेतले आहेत. साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम उद्याने, मंदिरे, ग्रंथालये, दवाखाना, सुवर्णपेढी, अनाथ आश्रम, लहान मोठे सभागृहे, पदरस्ता, गुहेत तसेच स्मशानभूमीतसुद्धा कवी संमेलने घेतली आहेत. ते शाळा, कॉलेज आणि विविध उत्सवांसाठी शब्द बोले काळजाला हा विशेष उपक्रम राबवीत असतात. अष्टुळ यांनी सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असे व्यासपीठ निर्माण केले आहे. त्यामुळे अनेक नामवंत कवी लेखक आणि साहित्यिक निर्माण झाले आहेत.
अष्टुळ हे महाराष्ट्र राज्य विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक असून पतसंस्थेच्या मार्फत सहकारक्षेत्रात , कामगार क्षेत्रात कामगार क्रेडिट सोसायटीच्या मार्फत, आध्यात्मिक क्षेत्रात स्वाध्याय परिवाराच्या मार्फत, कला आणि सांस्कृतिकक्षेत्रात कलाकारांसाठी कलाकार महासंघातर्फे गेली अनेक वर्ष ते अशा विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे विविध पदांवर कार्य करत आहेत. यामुळेच त्यांना आजवर अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज, अटल बिहारी वाजपेयी, कुसुमाग्रज, आद्यकवी कालिदास, कवी संजीव, महाराष्ट्र भूषण, मोहम्मद रफी, टॉप टेन कवी, चतुरस्त्र कवी आणि मनपा पुणे गुणवंत गौरव असे अनेक विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यांच्या कार्याचा आढावा घेऊन साप्ताहिक आपली चळवळ व जनसंवाद न्यूज समूहाने चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२६ प्रदान केला आहे.
यावेळी खरी पत्रकारिता सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य साप्ताहिक आपली चळवळ आणि जनसंवाद न्यूज करत असून या दोन्ही माध्यमांनी समाजासाठी प्रेरणादायी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. हे खूप मोठे कार्य या समूहांनी केले आहे. असे गौरवोद्गार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षण, साहित्य, सहकार, कलाकार, कामगार इत्यादी क्षेत्रातील उपस्थित रसिक प्रेक्षकांनी विनोद अष्टुळ यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष मिसाळ, प्रास्ताविक अजय उदाटे, यांनी तर आभार राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.
