वैभववाडी नगरपंचायत हद्दीत एकल महिलांचे सर्वेक्षण
नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांचे एकल महिलांना नोंदणीचे आवाहन; १८ ते २८ ऑगस्टदरम्यान सर्वेक्षण
वैभववाडी
महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या चौथ्या महिला धोरणांतर्गत एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील पात्र एकल महिलांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांनी केले आहे.
नगरपंचायत हद्दीतील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत तसेच १८ वर्षांवरील अविवाहित महिला यांची नोंदणी करण्यात येणार आहे. ही नोंदणी दि. १८ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यालय, वैभववाडी येथे करता येणार आहे.
नोंदणीसाठीचा अर्ज नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जासोबत आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, बँक पासबुक तसेच दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देणे, त्यांचे हक्क मिळवून देणे तसेच त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यालयाच्या तळमजल्यावरील DJSY विभाग (महिला व बालकल्याण विभाग) यांच्याशी संपर्क साधावा.
“एकटी नाही… आम्ही सोबत आहोत! आपली नोंदणी करा, आपले हक्क मिळवा, स्वावलंबी व सक्षम बना,” असे आवाहन नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांनी केले आहे.
