मालवण नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी कधी मिळणार?
आठ महिने उलटूनही पद रिक्त; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मालवण
मालवण नगरपरिषदेमध्ये सत्तेची सूत्रे हाती येऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी नगरपरिषदेला अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाही. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मालवण नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसणे ही गंभीर बाब असून, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
सध्या मालवण नगरपरिषदेचा पदभार ज्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे, ते अधिकारी आठवड्यातून केवळ दोन दिवस उपलब्ध असतात. त्यामुळे नगरपरिषदेशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच लोकप्रतिनिधींना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी नियमित उपलब्ध नसल्याने अनेक प्रशासकीय तसेच विकासात्मक कामे खोळंबली असून, नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्यात सत्ताधारी शासन अपयशी ठरले असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्यासाठी सध्या पदभार सांभाळत असलेल्या अधिकाऱ्यांनाच कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्त करावे किंवा मालवण नगरपरिषदेसाठी तात्काळ नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष गैरी अन्नरासिएशन, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
