मालवणात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन
माळगाव येथे गुरुवारी आयोजन; आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
मालवण :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग, उमेद व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता माळगाव येथील अॅड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल येथे हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बांधकाम सभापती संतोष साटविलकर, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनःश्याम झाड, जिल्हा परिषद सदस्य अक्षता गाडवे, वर्षा सांबारी, क्षमा हडकर, जिल्हा परिषद सदस्या सोनाली घाडीगावकर तसेच शेतकरी समितीचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तहसीलदार गणेश लव्हे आणि गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
तालुक्यात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पौष्टिक मूल्य, पारंपरिक खाद्यसंस्कृती तसेच रानभाज्यांचे संवर्धन व वापराबाबत शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाला जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आत्मा समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाटील व माळगाव सरपंच चैताली साळकर यांनी केले आहे.
