कै. प्रतिभा प्रमोद नाईक रेडकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रुग्णपयोगी वस्तूंचे दान
रेडकर कुटुंबीयांचा सेवाभावी उपक्रम; फावलर बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर व वॉकर संस्थेकडे सुपूर्द
सावंतवाडी
समाजामध्ये सामाजिक जाणीव असलेल्या दानशूर व्यक्ती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेत रुग्णसेवेसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करत आहेत. याच सेवाभावातून शहरातील प्रतिष्ठित चित्तरंजन नाईक रेडकर व देवेंद्र नाईक रेडकर यांनी त्यांच्या आई कै. प्रतिभा प्रमोद नाईक रेडकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला विविध रुग्णपयोगी वस्तू दान केल्या.
यामध्ये फावलर बेड, त्यावरील गादी, व्हीलचेअर, कमोड चेअर आणि वॉकर अशा अत्यावश्यक रुग्णोपयोगी साहित्याचा समावेश आहे. या वस्तूंचा लाभ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना होणार आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यावर विश्वास ठेवून यापूर्वीही अनेक दानशूर व्यक्तींनी संस्थेला रुग्णपयोगी साहित्य तसेच नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. ही रुग्णवाहिका सध्या गरजू रुग्णांच्या सेवेत कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
या दातृत्वाबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी नाईक रेडकर कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने सदस्य रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव उपस्थित होते.
