बांदा येथे बांधकामावरून पडून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू
रोजगारासाठी अवघ्या १० दिवसांपूर्वीच आला होता; काळसेवाडीतील दुर्घटनेने हळहळ
बांदा :
बांदा येथील काळसेवाडी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून एका परप्रांतीय तरुण कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रोजगाराच्या शोधात अवघ्या दहा दिवसांपूर्वीच तो शहरात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काळसेवाडी येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना संबंधित कामगार उंचावर काम करत होता. यावेळी अचानक तोल गेल्याने तो इमारतीवरून खाली कोसळला. मोठ्या उंचीवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृत कामगाराची ओळख व अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिक तपास सुरू आहे.
