You are currently viewing “सिंधुदुर्गला नव्या साई मंदिरापेक्षा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची गरज” – विलास सावंत

“सिंधुदुर्गला नव्या साई मंदिरापेक्षा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची गरज” – विलास सावंत

“सिंधुदुर्गला नव्या साई मंदिरापेक्षा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची गरज” – विलास सावंत

आमदार दीपक केसरकर यांनी धार्मिक घोषणांऐवजी आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित करावे; स्थानिक युवकांसाठी कायमस्वरूपी रोजगाराचीही मागणी

बांदा

सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला शिर्डीच्या धर्तीवर नव्या साईबाबा मंदिरापेक्षा अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची अधिक गरज असल्याचा घणाघाती टोला सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी लगावला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी धार्मिक प्रकल्पांच्या घोषणांपेक्षा आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत गोव्यातील उद्योजक पै काणे यांनी आडाळी एमआयडीसीमध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उद्योग उभारण्याची घोषणा केली होती. तसेच सावंतवाडीत भव्य साईबाबा मंदिर उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विलास सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे.
सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात ग्रामदैवतांची मंदिरे असून नागरिकांची त्यांच्यावर अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे आणखी एका धार्मिक स्थळापेक्षा जिल्ह्यात आधुनिक आरोग्य सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आजही सिंधुदुर्गवासीयांना गोवा किंवा इतर शहरांवर अवलंबून राहावे लागत असल्याने जिल्ह्यात तातडीने मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आडाळी एमआयडीसीतील प्रस्तावित गुंतवणुकीचे स्वागत करताना तेथील उद्योगांमधून स्थानिक युवकांना कायमस्वरूपी व गुणवत्तापूर्ण रोजगार मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केवळ घोषणांपुरते उद्योग न राहता प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती व्हावी आणि आडाळी तसेच कुडाळ एमआयडीसीच्या विकासासाठी ठोस औद्योगिक धोरण राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील घटती पटसंख्या चिंताजनक असल्याचे सांगत, कोकणातील भौगोलिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात आवश्यक बदल करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, शेतीपूरक उद्योग आणि फळबागायतदारांचे आर्थिक सक्षमीकरण यांनाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट मत विलास सावंत यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा