*लोकशिक्षक बाबा भारती*
*- प्रदीप गांधलीकर*
भौतिक चंगळवादाच्या अतिरेकामुळे मानवी जीवनात सर्वत्र तीव्र स्पर्धा, अहमहमिका, सत्तासंघर्ष वाढीस लागलेला दिसतो आहे. त्याची परिणती तिसऱ्या महायुद्धात होईल की काय या आशंकेने मानवजात भयभीत झालेली दिसते. या पार्श्वभूमीवर तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश पुन्हा आचरणात आणल्याशिवाय शोकमुक्त, भयमुक्त आणि बंधमुक्त समाजाची उभारणी करणे शक्य होणार नाही. तथागतांनी उपदेश केलेले हे पंचशील तत्त्वज्ञान सुत्तपिटक, विनयपिटक आणि अधिधम्मपिटक या तीन संग्रहातून अर्थातच ‘त्रिपिटक’ या काव्यात्मक धम्मपदात समाविष्ट करण्यात आले असून जगातील प्राचीन भाषांपैकी एक असा लौकिक असलेल्या पाली भाषेत ते आहे. साहजिकच बौद्ध काळापासून ते आजतागायत जगातील अनेक विद्वानांना ते साद घालत असते. त्यामुळे १८७२ ते १८७५ या कालावधीत प्रसिद्ध ब्रिटिश भाषाकोविद प्रो. राॅबर्ट सीज़र चाइल्डर्स यांनी दोन खंडांमध्ये पाली – इंग्रजी हा जगातील पहिला शब्दकोश तयार केला. त्यानंतर प्रो. टी. डब्लू. ऱ्हिस डेव्हिडस् आणि विल्यम स्टेड यांनीदेखील पाली – इंग्रजी शब्दकोश प्रकाशित केला. त्यानंतर १९५७ मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे ए. पी. बुद्धदत्त महाथेरा यांनी प्रकाशित केलेल्या पाली – इंग्रजी शब्दकोशाला मोठी लोकप्रियता लाभली. १९७४ मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान डाॅ. भदन्त आनंद कौसल्यायन यांनी पाली – हिंदी शब्दकोशाची निर्मिती केली. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेत एका प्राथमिक शिक्षकाने अथक परिश्रमातून १९८७ मध्ये पाली – मराठी हा पहिला शब्दकोश सिद्ध केला, ही बाब तमाम मराठी जनांसाठी अभिमानास्पद आहे. या शब्दकोशाचे निर्माते जगन्नाथ विष्णू उर्फ बाबा भारती गुरुजी यांचा इतिहास जाणून घेणे निश्चितच प्रेरणादायी अन् बोधप्रद आहे.
उरण – इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या छोट्याशा गावात २४ जून १९२५ रोजी जगन्नाथ यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही त्यांनी कसेबसे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथे एका खाजगी डाॅक्टरांकडे नोकरी पत्करली; आणि हालअपेष्टा सहन करीत आपले सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक चरितार्थासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली. सुमारे वीस वर्षे निष्ठेने अध्यापनाचे कार्य करीत असतानाच जगन्नाथ विष्णू यांनी मॅट्रिक आणि राष्ट्रभाषा रत्न या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या. अभ्यासूवृत्ती आणि वाचनाची आवड यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’ , ‘बहिष्कृत भारत’ आणि ‘जनता’ या नियतकालिकांचे ते व्रतस्थपणे नियमित वाचन करीत असत. अंधश्रद्धेला मूठमाती देऊन तथागतांची विज्ञाननिष्ठा अंगीकारली पाहिजे, असा या युवकाचा मनोनिग्रह होता. असे म्हटले जाते की, निष्ठा प्रामाणिक असेल तर निश्चितच फलप्राप्ती होते. याचा प्रत्यय या एकोणीस वर्षीय युवकाला आला; आणि १९४४ मध्ये अकल्पितरीत्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट झाली. ही भेट जगन्नाथ विष्णू या युवकाच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. बाबासाहेबांशी संपर्क वाढला अन् परिचय दृढ झाला. त्यातून त्यांनी ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनरहस्य’ हे पहिले पुस्तक लिहिले. पहिल्याच पुस्तकाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला. साहजिकच प्रभावी वक्ता, सिद्धहस्त लेखक, शीघ्रकवी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि त्याबरोबरच एक सुस्वभावी माणूस असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सुप्तगुण प्रकट होऊ लागले. समाजाच्या सुखदुःखाशी समरस होत असल्याने ‘बाबा भारती गुरुजी’ या उपाधीने सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. यासोबतच त्यांची ‘दैवगती’ (नाटक), ‘महार आणि महाराष्ट्र’ , ‘आंबेडकरवाद’ , ‘संत चोखोबाची समाजसेवा’ , ‘भूदान आणि अस्पृश्यांची समस्या’ , ‘बौद्ध संस्कारविधी’ , ‘आपली बौद्धतीर्थ यात्रा’ , ‘बुद्धगाथा’ (खंडकाव्य) अशी एकापाठोपाठ एक सुमारे चौदा
पुस्तके प्रकाशित झाली. ‘धम्मपद’ या पाली भाषेतील ग्रंथाचे बाबा भारती यांनी केलेले सुगम मराठी रूपांतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना खूप भावले. त्यांनी त्यासाठी आस्वादक प्रस्तावना तर दिलीच पण खुद्द शास्त्रीबुवांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. आचार्य शंकरराव जावडेकर यांनी या पुस्तकाची चिकित्सक समीक्षाही केली. या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाने तत्त्वज्ञान या या विषयाचा साहाय्यक ग्रंथ म्हणून १९८० मध्ये मान्यता दिली. त्यामुळे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमात या ग्रंथाचा समावेश करण्यात आला. पाली भाषेतील जगाला मानवतावादाची शिकवण देणारे बौद्ध तत्त्वज्ञान हे मराठीत सहजपणे समजले पाहिजे हा ध्यास घेऊन बाबा भारती यांनी संस्कृत भाषेतील विद्वान अमरसिंह यांचा ‘अमरकोश’ , जेम्स हेस्टिंग्स याचा ‘एनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका’ यांसह अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास करून १९८७ मध्ये सुमारे पंचवीस हजार शब्दांचा पहिला पाली – मराठी शब्दकोश सिद्ध केला. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थी, संशोधक आणि चिकित्सक वाचक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा शब्दकोश ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी पालीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आल्यानंतर अधिकच महत्त्वपूर्ण ठरला आहे.
बाबा भारती यांना नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद होता. त्यांच्या संग्रहात मोगलकालीन, शिवकालीन, ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिशकालीन नाण्यांसह विदेशातील सुमारे छत्तीस देशांची नाणी होती. नाण्यांसोबत माणसे जोडण्याचा विलक्षण छंदही भारतीगुरुजी यांनी जोपासला होता. त्यांनी भारतभ्रमण केले होते. पत्रलेखन आणि प्रत्यक्ष भेटीतून त्यांनी स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य माणसांशी ऋणानुबंध प्रस्थापित केले होते. जपानचे राजगुरू निचिदात्सू फुजी अर्थात फुजी गुरुजी, भिक्षू शांति सुगेई, जपानी बौद्ध भिक्खू तेंजो वातानावे, भदन्त संघरत्न मानके, डाॅ. भदन्त सावंगी मेधंकर अशी काही नावे वानगीदाखल उद्धृत करता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा इस्लामपूर शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
तथागत बुद्धांचे दया, क्षमा, शांती, सत्य, अहिंसा, करुणा हे मूल्यविचार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि सम्यक तत्त्वज्ञान समाजाला उन्नत अवस्थेकडे घेऊन जाईल, या दृढ विश्वासातून जीवन समर्पित केलेल्या लोकशिक्षक बाबा भारती यांचे २३ जुलै १९९० रोजी महाप्रयाण झाले. त्यांच्या विचारांचा वारसा लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून जोपासत सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करणारे त्यांचे सुपुत्र महेंद्र भारती यांना पाठबळ देणे, हीच बाबा भारती यांना खरी आदरांजली ठरेल!
*- प्रदीप गांधलीकर*
भ्रमणध्वनी :
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
*👇अभ्यासक्रम*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
*संपर्क : 8600879426 7588868705*
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
*संपर्क: 9421154594 7588868705*
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/
https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
