You are currently viewing आडाळी एमआयडीसीत १०० कोटींचा डेटा सेंटर उद्योग; सिंधुदुर्गातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी
Oplus_16908288

आडाळी एमआयडीसीत १०० कोटींचा डेटा सेंटर उद्योग; सिंधुदुर्गातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी

६ एकर जागेत उभारणार प्रकल्प; स्थानिकांना प्राधान्य, दहावी व आयटीआय उत्तीर्णांसाठी विशेष संधी – आमदार दीपक केसरकर

सावंतवाडी :

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कंटेनर डेटा सेंटरसाठी आवश्यक घटक निर्मितीचा उद्योग उभारला जाणार असून, या माध्यमातून सिंधुदुर्गातील शेकडो युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन इंडिया प्रा. लि. चे मालक सुनील पैकाणे आणि संचालक संदीप रेडकर उपस्थित होते.

केसरकर म्हणाले की, सुनील पेकाणे यांनी २०१० मध्ये बांदा-वाफोली येथे उद्योग सुरू केला असून, सध्या त्या उद्योगसमूहात सुमारे ७०० स्थानिक युवक कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर आडाळी एमआयडीसीमध्ये नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे. उद्योगासाठी आवश्यक सहा एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत उद्योगमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आडाळी एमआयडीसीमध्ये दर गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी उपलब्ध राहतील. तसेच अधिकाधिक उद्योग येथे आणून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उद्योगपती सुनील पैकाणे यांनी सांगितले की, जागेचा ताबा मिळाल्यानंतर सहा ते आठ महिन्यांत उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. कंपनीत स्थानिक युवकांना प्राधान्य दिले जाईल. दहावी उत्तीर्ण व आयटीआय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना विशेष संधी दिली जाणार आहे. वाफोली येथे कंपनीचे चार कारखाने कार्यरत असून, भविष्यात जागा उपलब्ध झाल्यास आणखी विस्तार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत केसरकर यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचाही आढावा घेतला. सावंतवाडीतील बहुप्रतिक्षित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, दोडामार्ग रुग्णालय पूर्णत्वास येत आहे, तर वेंगुर्ला व शिरोडा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सावंतवाडी येथे बीओटी तत्त्वावरील बस पोर्ट, तिलारी परिसरातील ॲम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स, ॲनिमल सेंटर, आंबोलीतील गोल्फ कोर्स व अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, तसेच सावंतवाडीत पर्यटनाला चालना देणारे साई मंदिर उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.

याशिवाय, वडील वसंतराव केसरकर यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून सामाजिक उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जिल्ह्याच्या संबंधांचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा