You are currently viewing संत राऊळ महाराज महाविद्यालयात आवाज व कथाकथन संस्कार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Oplus_16908288

संत राऊळ महाराज महाविद्यालयात आवाज व कथाकथन संस्कार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आपला आवाज हीच आपली ओळख’; ज्येष्ठ रंगकर्मी व स्वर संस्कार तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे मार्गदर्शन

कुडाळ :

“आपला आवाज हीच आपली ओळख आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा चांगलं बोललात की आपली चांगली छाप पडते. त्यासाठी आवाज आणि तो कसा वापरावा हे शिकणं महत्त्वाचं आहे. यासाठीच संत राऊळ महाराज महाविद्यालयाने विद्यार्थ्यांपासून सर्वांसाठी या आवाज संस्कार कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. यासाठी महाविद्यालयाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आणि स्वर संस्कार तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांनी केले. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आवाज व कथाकथन संस्कार कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला सिंधुदुर्गसह गोव्यातील विविध वयोगटातील सुमारे ७५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

आपला आवाज हीच आपली ओळख आहे. चांगलं, स्पष्ट बोलण्याने आपली छाप पडते. त्याचबरोबर कथाकथनसुद्धा एक कला आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी, १७ जुलै रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालयात आवाज व कथाकथन संस्कार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचे उद्घाटन कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत, उद्घाटक सौ. वर्षा वैद्य, मार्गदर्शक श्रीनिवास नार्वेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, रंगकर्मी निलेश जोशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंगेश जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष केदार सामंत यांनी आवाजाचे महत्त्व, महाविद्यालयात शिकताना सांस्कृतिक क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रातही चांगला आणि स्वच्छ आवाज कसा महत्त्वाचा आहे हे सांगितले. तर उद्घाटक सौ. वर्षा वैद्य यांनीसुद्धा आवाजाचे महत्त्व विविध उदाहरणांतून पटवून दिले. यावेळी रंगकर्मी निलेश जोशी आणि प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.

उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संतोष वालावलकर यांनी, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सुहास पाटील यांनी करून दिला. उपस्थितांचे स्वागत प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले.

या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांबरोबरच इतर क्षेत्रातील व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या. गोव्यातूनसुद्धा काही प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सुमारे ७५ प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

मार्गदर्शक श्रीनिवास नार्वेकर यांनी आवाजाच्या बाबत अत्यंत छान मार्गदर्शन केले. आवाजाची जाणीव आणि योग्य वापर, प्रभावी, आत्मविश्वासपूर्वक आणि स्पष्ट कसे बोलायचे, व्हॉइस प्रोजेक्शन, मॉड्युलेशन, योग्य शब्दोच्चार, लय, चढ-उतार आणि शब्दांचे वजन, श्रोत्यांचे लक्ष कसे वेधायचे, कथाकथनाबाबतच्या टिप्स, अभिनय, डबिंग, व्हॉइसओव्हर व कथाकथनातील प्राथमिक गोष्टी, तसेच स्टेजवरील भीती कशी घालवायची अशा विषयांवर त्यांनी अत्यंत सोप्या शैलीत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसनही त्यांनी केले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा