उर्वरित बांधकामाचा आढावा; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी गुणवत्तापूर्ण कामावर भर
कणकवली :
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मार्केट यार्डच्या उर्वरित बांधकामाची सद्यस्थिती, आवश्यक निधी आणि पुढील कामाचे नियोजन याबाबत पालकमंत्र्यांनी सभापती व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
मार्केट यार्डचे उर्वरित बांधकाम निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. शेतकरी, व्यापारी आणि कृषी पणनाशी संबंधित सर्व घटकांच्या हितासाठी हे आधुनिक मार्केट यार्ड लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामाला गती द्यावी आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
