*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मृदगंध…*
सरसर आली धार पहिली माती आसुसली
तप्त धरेवर कोसळता ती माती उसासली
वाफा दाटल्या मृदगंधाच्या सुवास पसरला
दरवळला तो आसमंत नि परिसर सुखावला…
आनंदी आनंद पसरला वावटळ अवघडली
सोबत घेऊन सुगंध सारा नाचत बागडली
चैतन्याचे पेवच फुटले झाडे शहारली
फडफड करूनी किलबिल सारी पानात दडली..
वसुंधरेच्या अंगोपांगी माती फुलारली
माती चंदन लेप लागला मनात मोहरली
बीजबियाणे पोटात आता गर्भार होणार मी
रोमांचांनी फुलेल काया दानच देईन मी..
सपसप सपसप पाऊसधारा सचैल न्हाऊन
नर्तन चाले धारांचे जणू दाखवती गाऊन
अवचित येती कोंभ धरेतून गुलाबी तपकिरी
झाडावर पाने भिजून चिंब अंगावर शिरशिरी..
किमया सारी असे सरींची सृजन नवलाई
पोटात घेऊन बिया मृदाही गाते मग अंगाई
पाऊसधारा अवनीचे हे होताच मिलन
जीवन फुलते चहूकडे मग जाते चणचण ..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
