वागदे ग्रामपंचायतीकडून वृक्षारोपण उपक्रम; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरित संदेश
मुंबई-गोवा महामार्गालगत सहा किलोमीटर परिसरात वृक्षलागवड; पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
कणकवली :
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. वागदेचे सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे सहा किलोमीटर परिसरात प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमाचा शुभारंभ शितल दळवी, अक्षता राणे, नीलम पालव आणि संजना गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वागदेचे सरपंच संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, बूथ प्रमुख लक्ष्मण घाडीगावकर, भाई काणेकर, सुनील ताटे, संजय घाडीगावकर, महेश सरंगले, अमित दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच संदीप सावंत यांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आगामी काळात सावलीसाठी उपयुक्त तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धन, हरित ग्रामपंचायत आणि स्वच्छ परिसर या उद्दिष्टांमधून हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनीही वृक्षसंवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षारोपणासह वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही भर देण्यात येणार असून, पर्यावरण संरक्षणासाठी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
