You are currently viewing तिलारी घाटात अवजड ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प

तिलारी घाटात अवजड ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प

तिलारी घाटात अवजड ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प

बंदी असतानाही ट्रकचा प्रवेश; कोल्हापूर-दोडामार्ग एसटीसह प्रवासी वाहने खोळंबली, प्रशासनावर नागरिकांचा संताप

दोडामार्ग
बेळगाव, गोवा आणि कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या तिलारी घाटात काल रात्री एक अवजड ट्रक अडकल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो घाटातील एका तीव्र वळणावर अडकून पडला असून, त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
सध्या केवळ छोटी चारचाकी आणि दुचाकी वाहने जेमतेम मार्ग काढत पुढे जात आहेत, तर मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या घटनेमुळे रात्रीपासूनच अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तिलारी घाटातून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पोलीस प्रशासनाने पूर्वीपासूनच कायदेशीर बंदी घातली आहे. मात्र, अनेक ट्रक चालक अंतर आणि इंधन बचतीसाठी चोरीछुपे या धोकादायक व अरुंद मार्गाचा वापर करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. याच बेजबाबदारपणामुळे घाटात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
घाटात ट्रक अडकल्याने पहाटे कोल्हापूरहून दोडामार्गकडे येणारी एसटी बस तसेच इतर प्रवासी वाहनेही अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली असून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
अवजड वाहनांना बंदी असतानाही अशी वाहने घाटात प्रवेश कशी करतात, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या मार्गावर पोलिसांचे प्रभावी नियंत्रण नसल्यामुळेच ट्रक चालक नियम धाब्यावर बसवून घाटमार्गाचा वापर करतात, असा आरोपही केला जात आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून अडकलेला ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा