तरंदळे जि.प. शाळेचा पट 41 वर; ग्राम समितीच्या प्रयत्नांना मोठे यश
विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा, वाचनालय व कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू; गावकऱ्यांना सहकार्याचे आवाहन
तरंदळे
ग्राम शालेय व सामाजिक उपक्रम समिती, तरंदळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 च्या विद्यार्थी पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून शाळेचा पट 29 वरून थेट 41 वर पोहोचला आहे. शाळा टिकविण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समितीने राबविलेल्या विविध उपक्रमांना यश मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समितीच्या सदस्यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. मागील वर्षी शाळेचा पट 36 होता. त्यातील सात विद्यार्थी आठवीसाठी कणकवली येथे गेल्याने पटसंख्या 29 वर आली होती. मात्र, समितीने केलेल्या जनजागृतीमुळे यंदा पाचवी, सहावी व सातवीसाठी 12 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून एकूण पटसंख्या 41 झाली आहे. समितीचे पहिले उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी समितीने नव्याने दाखल झालेल्या 12 विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी दरमहा सुमारे दहा हजार रुपयांच्या वाहतूक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी शाळेत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. पालकांनी मुलांना मोबाईलऐवजी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन समितीने केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शनिवार व रविवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत कराटे प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आला आहे. मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी प्रतीमहिना केवळ 100 रुपये माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या “विद्येविना मती गेली” या विचारातून प्रेरणा घेऊन समिती कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. “एक गाव, एक शाळा, एक परिवार” या संकल्पनेतून शाळेच्या विकासासाठी शिक्षणप्रेमी, दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांनी आर्थिक तसेच मानसिक सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. आतापर्यंत सहकार्य केलेल्या सर्व देणगीदार, हितचिंतक व ग्रामस्थांचे समितीने आभार मानले.
यावेळी पंचायत समिती सदस्य संजना राणे, सरपंच सुशिल कदम, ग्राम शालेय व सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. सत्यवान राणे, सचिव रामनाथ सावंत, मुख्याध्यापक चंद्रशेखर पोकळे, उपमुख्याध्यापक रामचंद्र डोईफोडे, माजी सरपंच जयसिंग नाईक, अनंत सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुनीलदत्त जाधव, माजी उपसरपंच संदेश सावंत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूनम चव्हाण, उपाध्यक्षा प्राची कदम, प्रभाकर कदम, प्रसाद कदम, वाघमारे मॅडम, वायभट्ट मॅडम तसेच ग्रामस्थ, महिला, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
