महिला औद्योगिक संस्थांना ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख देणार : मनीष दळवी
जिल्ह्यात ५० महिला औद्योगिक संस्थांची नोंदणी करण्याचे आवाहन; क्लस्टर पद्धतीवर भर
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात महत्त्वपूर्ण प्राथमिक बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी महिला उद्योग संस्थांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतंत्र ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा मानस व्यक्त केला.
प्रत्येक संस्थेने आपल्या भागातील उपलब्ध संसाधने आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वेगवेगळ्या उत्पादनांची निवड करावी. त्यामुळे उत्पादनात विविधता निर्माण होईल आणि वाहतूक खर्चातही बचत होईल, असे दळवी यांनी सांगितले.
महिला संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी चार ते पाच संस्थांनी एकत्र येऊन क्लस्टर तयार करावेत. तसेच जिल्ह्यात किमान ५० महिला औद्योगिक संस्थांची नोंदणी व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आठ तालुक्यांमधील संस्थांचे पाच विभाग करून मार्केटिंग, कोल्ड स्टोरेज, ब्रँडिंग आणि प्रोसेसिंग या बाबी एकत्रितपणे राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यातील दर्जेदार उत्पादने मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला जिल्हा बँकेच्या संचालिका नीता राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, NABARDच्या जिल्हा प्रबंधक दिपाली माळी, Reserve Bank of Indiaच्या बेनझीर शेख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ऋषिकेश गावडे यांच्यासह जिल्ह्यातील ३७ महिला संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
