You are currently viewing फोंडाघाटमधील दोन्ही ऐतिहासिक पुलांचे काम पूर्ण; वाहतूक पूर्ववत सुरू

फोंडाघाटमधील दोन्ही ऐतिहासिक पुलांचे काम पूर्ण; वाहतूक पूर्ववत सुरू

फोंडाघाटमधील दोन्ही ऐतिहासिक पुलांचे काम पूर्ण; वाहतूक पूर्ववत सुरू

वलसा घालण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका; पावसापूर्वी काम पूर्ण झाल्याने समाधान

फोंडाघाट :

फोंडाघाट येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील तसेच बाजारपेठेतील इंग्रजकालीन दोन्ही पुलांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुलांच्या कामामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने वलसा घालून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ व इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. मात्र आता दोन्ही पूल सुरू झाल्याने हा त्रास दूर झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पावसाळ्यापूर्वी पुलांचे काम पूर्ण न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला होता. त्यानंतर कामाला गती देण्यात आली आणि अखेर दोन्ही पुलांची कामे पूर्ण करण्यात आली.

फोंडाघाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा व तुलनेने सुरक्षित घाटमार्ग मानला जात असल्याने अनेक वाहनचालक या मार्गाला प्राधान्य देतात. सध्या सर्व प्रकारची वाहतूक सुरळीतपणे सुरू असून नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा