You are currently viewing जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे सर्वोदय नगर येथे भव्य वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे सर्वोदय नगर येथे भव्य वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे सर्वोदय नगर येथे भव्य वृक्षारोपण

‘एक पेड माँ के नाम’ अभियानाला प्रतिसाद; प्रत्येक बूथवर २५ झाडे लावण्याचे आमदार प्रमोद जठार यांचे निर्देश

सावंतवाडी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सर्वोदय नगर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविणे आणि निसर्गाचा समतोल राखणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी कांचन, मोहगणी, बहावा आदी विविध प्रकारची १५ झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत यावेळी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच निसर्गाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचेही त्यांनी नमूद केले.
वृक्षारोपण मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रत्येक विभागातील बूथवर किमान २५ झाडे लावण्याचे निर्देश आमदार जठार यांनी सर्व नगरसेवकांना दिले. शहराचा परिसर हिरवागार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, रणजीत देसाई, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन समिती सभापती आनंद नेवगी, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, तसेच निलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, सिद्धार्थ भांबुरे आणि शिवसेना नगरसेवक अजय गोंदवले आदी उपस्थित होते.
या मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर आणि बूथ पातळीवरील पदाधिकारी तसेच विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. वृक्षारोपण उपक्रमामुळे सावंतवाडी परिसरात उत्साहपूर्ण आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा