फायनान्स कंपन्या व रेपो एजंटांच्या अन्यायाविरोधात ग्राहक एकवटणार
‘सिंधुदुर्ग NBFC पीडित ग्राहक कृती समिती’चे सार्वजनिक आवाहन; तक्रारी व पुरावे सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग :
फायनान्स कंपन्या, बँका आणि रेपो एजंटांकडून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी ‘सिंधुदुर्ग NBFC पीडित ग्राहक कृती समिती’च्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात येत असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासाठी अन्यायग्रस्त नागरिकांनी पुढे येऊन आपले अनुभव, तक्रारी आणि पुरावे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
समितीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बेकायदेशीर वाहन जप्ती, कर्ज वसुलीसाठी होणारा दबाव, अवाजवी दंड व शुल्क आकारणी तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागलेल्या ग्राहकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने ग्राहक हक्कांसाठी लढा उभारण्याचा समितीचा मानस आहे.
यामध्ये अन्यायग्रस्त वाहनधारक, कर्जदार ग्राहक, बेकायदेशीर रेपो कारवाईचे बळी तसेच अवाजवी दंड व शुल्कामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघटितपणे आवाज उठवल्यास न्याय मिळविणे अधिक सोपे होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.
“एकटा ग्राहक दुर्बल असतो, पण संघटित ग्राहक शक्तिशाली असतो,” असा संदेश देत समितीने नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९३०७११९९११ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा “सिंधुदुर्ग NBFC पीडित ग्राहक कृती समिती” या फेसबुक पेजला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“अन्यायाविरुद्ध एकजूट – ग्राहक हक्कांसाठी लढा”, “ग्राहकांचा आवाज, न्यायाचा लढा” आणि “बेकायदेशीर रेपो बंद करा – ग्राहकांना न्याय द्या” ही घोषवाक्ये यावेळी प्रसिद्ध करण्यात आली.
