You are currently viewing राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची चमक

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची चमक

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची चमक

४९८ खेळाडूंमधून ७३ वे स्थान; सिंधुदुर्गच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

सावंतवाडी

विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे आणि ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल बुद्धिबळपटू, सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ७३ वा क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

भारतातील विविध राज्यांमधून तब्बल ४९८ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ३१४ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंचा समावेश होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत बाळकृष्णने नऊ फेऱ्यांपैकी पाच फेऱ्यांमध्ये विजय मिळवला, तर दोन फेऱ्या बरोबरीत सोडवत एकूण ६ गुणांची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने ७३ व्या स्थानावर झेप घेतली.

या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर खेळाडूंनीही आपली छाप पाडली. मालवण येथील दृष्टिहीन बुद्धिबळपटू मयुरेश परुळेकर याने नऊ फेऱ्यांपैकी चार विजय आणि एक बरोबरी मिळवत साडेचार गुणांची नोंद केली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये तब्बल २७ गुणांची वाढ झाली आहे.

तसेच मालवणच्या मयुरेश मालवणकर यानेही स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन केले.

या सर्व खेळाडूंना ‘मुक्ताई ॲकेडमी’चे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ. स्नेहा पेडणेकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला असून, सर्व स्तरांतून या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा