You are currently viewing ओटवणेत बोलेरो-दुचाकी भीषण अपघात; माय-लेक गंभीर जखमी

ओटवणेत बोलेरो-दुचाकी भीषण अपघात; माय-लेक गंभीर जखमी

ओटवणेत बोलेरो-दुचाकी भीषण अपघात; माय-लेक गंभीर जखमी

अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकाला ग्रामस्थांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

सावंतवाडी

ओटवणे-कपाईवाडी मार्गावर आज सकाळी बोलेरो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे माय-लेक गंभीर जखमी झाले. सीमा सचिन तळवडेकर आणि त्यांचा मुलगा आदी तळवडेकर अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात सीमा तळवडेकर यांच्या पायाला, तर आदीच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ओटवणे मार्गावरून दुचाकीने प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की माय-लेक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ उपचारासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर बोलेरो चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, कपाईवाडी येथील सतर्क ग्रामस्थांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा