पर्यटन विभाग व पर्यटन व्यावसायिक महासंघाचा संयुक्त पुढाकार; जिल्ह्यातील पर्यटन समस्या, संधी आणि विकासाच्या दिशांवर होणार सविस्तर चर्चा
मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रासमोरील समस्या, स्थानिक अडचणी तसेच पर्यटन विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन व्यावसायिक, संस्था आणि पर्यटनाशी संबंधित घटकांनी या चर्चासत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कोकण विभागाच्या विभागीय पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर या जिल्ह्यातील पर्यटन विकास, स्थानिक अडचणी आणि पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक सूचना जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पर्यटन व्यवसायिकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेऊन पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक दिशा ठरविण्याचा प्रयत्न या चर्चासत्रातून होणार आहे.
राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्थानिक स्तरावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ समन्वयकाची भूमिका बजावत आहे. बुधवार, दि. ३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता तारकर्ली येथील घर मिठाबावकर येथे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग हा राज्य व केंद्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून मान्य केलेला जिल्हा असून पर्यटन विकासासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जलपर्यटनाबरोबरच इतिहास, वैद्यकीय पर्यटन, वारसा पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन, खाद्य पर्यटन तसेच कातळशिल्प पर्यटन अशा विविध क्षेत्रांत बारमाही पर्यटन वाढविण्याची मोठी क्षमता जिल्ह्यात आहे. मात्र यासाठी प्रशासन आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिक यांच्यात अधिक प्रभावी समन्वयाची गरज असल्याचे मत विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केले.
शासनाकडून पर्यटनवाढीसाठी विविध पायाभूत प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असली तरी या पर्यटनस्थळांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ब्रँडिंग आणि प्रसिद्धी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कातळशिल्पे, जागतिक वारसा यादीत समाविष्ट विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा, आंगणेवाडी, कुणकेश्वर मंदिर, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, वैभववाडीतील बकासुर वाडा, नापणे येथील काचेचे फूल, सावंतवाडी राजवाडा, केएसआर ग्लोबल अॅक्वेरियम, आंबोलीची जैवविविधता, गंजीफा खेळ, दशावतार कला, विविध खाद्यसंस्कृती आणि जिल्ह्यातील अनेक अपरिचित समुद्रकिनारे यांना व्यापक प्रसिद्धी मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या बळावर व्यवसाय उभे केले आहेत. मात्र आवश्यक परवाने, अनुदान, पर्यटनपूरक सुविधा आणि इतर प्रशासकीय प्रश्नांवर या चर्चासत्रातून मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, व्यावसायिक आणि व्यक्तींनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनी पर्यटनविषयक सूचना व मुद्दे पर्यटन व्यावसायिक महासंघाचे समन्वयक रवींद्र खानविलकर यांच्या ९९६९८७१०९८ या व्हॉट्सअँप क्रमांकावर पाठवावेत, अशी माहिती अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.
