You are currently viewing कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय वेदांतचा मृत्यू

कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय वेदांतचा मृत्यू

कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय वेदांतचा मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या चिमुरड्यावर काळाचा घाला; दोडामार्ग परिसरात हळहळ

दोडामार्ग
कुडासे-वानोशी नदी परिसरात अंघोळीसाठी गेलेल्या वेदांत सचिन सांगेलकर या अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी घडली असून, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गावी आलेल्या चिमुरड्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा मूळचा मुंबई येथील रहिवासी होता. सध्या तो आपल्या आजीसोबत दोडामार्ग येथे राहत होता. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने तो गावी आला होता. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तो आपल्या भावासोबत कुडासे-वानोशी नदीवर अंघोळीसाठी गेला होता. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.

वाचविण्याचे प्रयत्न ठरले अपयशी

वेदांतला वाचवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले.

त्यानंतर त्याला तातडीने साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले.

गावावर शोककळा; पालकांना सतर्कतेचे आवाहन

या भीषण दुर्घटनेमुळे सांगेलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नदी, ओढे आणि धरण परिसरात अंघोळीसाठी जाणाऱ्या मुलांची संख्या वाढत असल्याने पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा