You are currently viewing शिवराजेश्वर मंदिराला वर्षाला १ लाख, औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाख; हिंदु जनजागृती समितीचा संताप

शिवराजेश्वर मंदिराला वर्षाला १ लाख, औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाख; हिंदु जनजागृती समितीचा संताप

शिवराजेश्वर मंदिराला वर्षाला १ लाख, औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाख; हिंदु जनजागृती समितीचा संताप

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक मंदिरासाठी वार्षिक १२ लाख निधीची मागणी; “हा छत्रपती शिवरायांचा अवमान”

कुडाळ :

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवण्यात आलेला वार्षिक १ लाख रुपयांचा निधी अत्यंत तुटपुंजा असून, तो औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षाही कमी असल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. मंदिरासाठी विशेष बाब म्हणून वार्षिक १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी केली.

कुडाळ येथील हॉटेल स्पाइस कोकण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, हिंदु जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ आणि शिवप्रेमी संघटनेचे रमाकांत नाईक उपस्थित होते.

संजय जोशी म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि शिवप्रेमी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराच्या निधीवाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महायुती सरकारने २० मे २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे मंदिराचा निधी १ लाख रुपये केला असला तरी ही वाढ अत्यंत अपुरी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना महिन्याला ५० हजार रुपये निधी देण्याचे निर्देश दिले होते. मग प्रत्यक्ष मंजूर निधी इतका कमी कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने औरंगजेबाच्या कबरीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी २०२२ आणि २०२३ मध्ये अनुक्रमे २,५५,१६० रुपये आणि २,००,६२६ रुपये खर्च केले आहेत. हा निधी शिवराजेश्वर मंदिरासाठी घोषित निधीपेक्षा दुपटीने अधिक असल्याचा दावा समितीने केला आहे.

समितीच्या मते, शासनाने मंजूर केलेल्या १ लाख रुपयांचा विचार केल्यास महिन्याला केवळ ८,३३३ रुपये, म्हणजेच प्रतिदिन सुमारे २७४ रुपये खर्चासाठी उपलब्ध होतात. यात नित्यपूजा, फुले, आरती साहित्य, प्रसाद, मूर्तीचे वस्त्रालंकार, स्वच्छता, पुजाऱ्यांचे वेतन, बोटीचा प्रवास खर्च तसेच शिवजयंतीसारखे उत्सव यांचा खर्च भागणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती राजाराम महाराजांनी १६९५ मध्ये बांधलेले हे जगातील एकमेव मंदिर असून येथे शिवछत्रपतींच्या मूर्तीची पूजा केली जाते. तसेच महाराजांच्या हातांचे आणि पायांचे ठसे येथे जतन करण्यात आले आहेत. अशा ऐतिहासिक वारशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे अक्षम्य असल्याचे समितीने म्हटले आहे.

मंदिरासाठी महिन्याला किमान १ लाख रुपये, म्हणजे वार्षिक १२ लाख निधी मंजूर करून परिसराचे सुशोभीकरण करावे. तसेच औरंगजेबाच्या कबरीसाठी दिला जाणारा निधी तातडीने बंद करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा