You are currently viewing सिंधुदुर्गातील पतसंस्थांचे पहिले भव्य अधिवेशन २३ व २४ मे रोजी आंबोलीत
Oplus_16908288

सिंधुदुर्गातील पतसंस्थांचे पहिले भव्य अधिवेशन २३ व २४ मे रोजी आंबोलीत

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; तज्ज्ञांचे मार्गदर्शन, गौरव सोहळा आणि सायबर क्राईमसह विविध विषयांवर चर्चासत्र

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच नोंदणीकृत सहकारी पतसंस्थांचे दोन दिवसीय भव्य अधिवेशन २३ आणि २४ मे २०२६ रोजी आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी यासंदर्भातील माहिती दिली. विविध वैशिष्ट्ये आणि मार्गदर्शनाने परिपूर्ण असे हे अधिवेशन ठरणार आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

जिल्ह्यात सध्या नागरी, ग्रामीण, बिगरशेती आणि पगारदार अशा एकूण १५० पतसंस्था कार्यरत आहेत. यातील अनेक पतसंस्थांनी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन करत पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक खेळते भागभांडवल उभे केले आहे. अशा संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. पतसंस्थांची चळवळ अधिक मजबूत व्हावी आणि त्यांचा कार्यविस्तार वाढावा, हा या अधिवेशनामागील मुख्य उद्देश आहे.

दोन दिवसांच्या या अधिवेशनात पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे हे ‘नव्याने लागू झालेला आदर्श उपविधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पुणे येथील आर. व्ही. यादव हे ‘कर्ज वितरण व कर्ज वसुलीतील समस्या’ यावर भाष्य करणार असून, पुंडलिक सातोसे हे वाढत्या ‘सायबर क्राईम’च्या धोक्यावर प्रकाश टाकणार आहेत.

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे. विविध भागात स्वागत कमानी आणि बॅनर उभारण्यात आले आहेत. २३ आणि २४ मे रोजी होणारे हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व पगारदार व ग्रामीण पतसंस्थांनी एकसंघ होऊन सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे. या नियोजनासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच सर्व सहायक निबंधक कार्यालयांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा