देवगड सातपायरी येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
समोरासमोर धडकेत ओंकार सारंग जखमी; निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल
देवगड
देवगड सातपायरी येथे रविवारी दुपारी झालेल्या दुचाकी अपघातात ओंकार अनिलकुमार सारंग (२८, रा. शिवनगर, देवगड) हा युवक गंभीर जखमी झाला. जामसंडे येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार सारंग हा आपल्या दुचाकीवर आकाश संजय जगताप (२४, रा. पवनचक्की, देवगड) याच्यासह बारशाच्या डेकोरेशनच्या कामासाठी शिवनगरहून जामसंडेकडे जात होता. यावेळी सातपायरी येथे समोरून भरधाव वेगाने आलेल्या गणेश रामकृष्ण लब्दे (३७, रा. साई कॉलनी, तळेबाजार) यांच्या दुचाकीची जोरदार धडक ओंकारच्या दुचाकीला बसली.
या अपघातात ओंकार हा रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला, तर आकाश जगताप याला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर ओंकारला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी आकाश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलीस स्थानकात गणेश लब्दे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ)(ब) तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.
