कुडाळमध्ये ‘आकाशदर्शन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला अंतराळाचा थरारक अनुभव
कुडाळ
‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत कुडाळ येथे आयोजित ‘आकाशदर्शन व खगोलशास्त्र करिअर संधी’ या कार्यक्रमाला खगोलप्रेमी आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन महीमचे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आ. सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जपणे हे राजकीय व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मंदार शिरसाट यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी आमदार वैभव नाईक यांनीही या कार्यक्रमाचे अभिनंदन करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रासारख्या विषयाची गोडी निर्माण होण्यास अशा उपक्रमांची मदत होते, असे सांगितले.
दुर्बिणीतून अनुभवले चांदणे
खगोल तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना अंतराळातील अद्भुत विश्वाची सफर घडवली. तीन मोठ्या दुर्बिणींच्या साहाय्याने चंद्र, विविध ग्रह आणि ताऱ्यांचे थेट दर्शन घडवण्यात आले. तसेच लेझर शोच्या माध्यमातून आकाशातील राशी व नक्षत्रांची माहिती देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थी भारावून गेले. प्रभुणे यांनी स्लाईड शोद्वारे खगोलशास्त्रातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, राजन नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
