You are currently viewing जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सावंतवाडी नगरपरिषदेला भेट

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सावंतवाडी नगरपरिषदेला भेट

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सावंतवाडी नगरपरिषदेला भेट

विकासकामे, योजना अंमलबजावणीचा सविस्तर आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सावंतवाडी :

शहरातील विकासकामे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यपद्धती अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवारी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट देत सर्व विभागांचा सखोल आढावा घेतला.
नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या या बैठकीच्या सुरुवातीला मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. बैठकीदरम्यान विषयसूचीत असलेल्या १९ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये नगरपरिषदेचे आर्थिक व्यवहार, प्रशासकीय पारदर्शकता तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.
तृप्ती धोडमिसे यांनी शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशा सूचना दिल्या. तसेच शहरातील रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावण्याबाबत मार्गदर्शन करत संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीनंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्राला भेट दिली व तेथील यंत्रणेचा आढावा घेतला. याशिवाय शहरातील विविध विकासकामांच्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली. सर्व कामे दर्जेदार पद्धतीने व निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले.
प्रशासकीय सुधारणा आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे नमूद करत सावंतवाडी नगरपरिषदेकडून प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा