You are currently viewing सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल कणकवली येथे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

सागरी किल्ले अध्ययन केंद्रासाठी पुढाकाराबद्दल कणकवली येथे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

कणकवली :

राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा. आशिषजी शेलार यांचा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. मालवण येथे “सागरी किल्ले अध्ययन केंद्र” स्थापन करण्यासाठी त्यांनी केलेल्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य गुरुनाथ राणे यांच्याहस्ते मा. आशिष शेलार यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मा. आशिष शेलार यांनी सागरी किल्ले अध्ययन केंद्राच्या स्थापनेसाठी आवश्यक वित्तीय मान्यता व तांत्रिक बाबींमध्ये शासनाच्या स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. *“या अध्ययन केंद्रामुळे सागरी किल्ल्यांच्या इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि वारसा संवर्धनाला नवी दिशा मिळेल व भविष्यात हे केंद्र संशोधनासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक जलदुर्गांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी आणि सक्षम, सशक्त राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे”* मा. आशिष शेलार यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे साक्षीदार असलेल्या सागरी किल्ल्यांचा इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने जगासमोर आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे मा. आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत मालवण येथे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार अभेद्य सागरी किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी विशेष “अध्ययन केंद्र” स्थापन करण्याची घोषणा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८ वर्षपूर्ती सोहळ्यात केली होती. तसेच त्यांनी या केंद्रासाठी पन्नास लाख रुपयांचा निधीही घोषित केला होता. त्यांच्या घोषणेनुसार मुंबई विद्यापीठ संलग्न स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट व पद्मदुर्ग हे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले ऐतिहासिक सागरी किल्ले असून मराठा आरमाराच्या इतिहासात त्यांना विशेष स्थान आहे. या अध्ययन केंद्रामार्फत जलदुर्गांचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये, मराठा सागरी रणनीती व सांस्कृतिक वारसा यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जाणार आहे. तसेच मोडी, पर्शियन व पोर्तुगीज भाषेतील ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन व भाषांतर, किल्ल्यांचे डिजिटायझेशन (३D स्कॅनिंग, नकाशे), संशोधन प्रकल्प, अभ्यासदौरे, कार्यशाळा व सेमिनार यांसारखे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. ‘सागरी किल्ले वारसा, संवर्धन व व्यवस्थापन’ या विषयावर अभ्यासक्रम सुरू करण्याचाही मानस आहे.

या सत्कार प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. चंद्रशेखर कुशे यांनी माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार यांचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, कृ. सी..देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. संग्रामसिंह पवार आणि प्रा. हसन खान उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा