You are currently viewing कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये ‘अल्ताफ खान सर स्मृती डिजिटल कक्षा’चे उद्या भव्य उद्घाटन

कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये ‘अल्ताफ खान सर स्मृती डिजिटल कक्षा’चे उद्या भव्य उद्घाटन

कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये ‘अल्ताफ खान सर स्मृती डिजिटल कक्षा’चे उद्या भव्य उद्घाटन

​सावंतवाडी ।
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येथील प्रसिद्ध कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये सोमवार, १३ एप्रिल रोजी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी सोहळा संपन्न होणार आहे. शाळेचे अत्यंत लाडके आणि आदर्श शिक्षक कै. अल्ताफ खान सर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने शाळेला भेट देण्यात आलेल्या ‘डिजिटल कक्षा’चे भव्य उद्घाटन सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

​अल्ताफ खान सरांनी आपल्या प्रदीर्घ अध्यापन काळात हजारो विद्यार्थी घडवले. त्यांच्या शिस्तबद्ध पण प्रेमळ स्वभावामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. हिंदी विषयावरील त्यांचे प्रभुत्व आणि वाचनाची आवड यामुळे त्यांनी अनेक पिढ्यांना ज्ञानाचे बाळकडू दिले. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतील नवीन पिढीला आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली व्हावीत, या उदात्त हेतूने खान परिवाराने या डिजिटल कक्षाची उभारणी केली आहे. आपल्या दिवंगत कुटुंबियांच्या स्मृती जपतानाच समाजाचे देणे लागते, या भावनेतून त्यांनी उचललेले हे पाऊल सर्वांसाठी आदर्श ठरले आहे.

​उद्घाटन सोहळ्याला शाळेचे माजी विद्यार्थी, आजी-माजी गुरुवर्य, शालेय समितीचे संचालक तसेच चेअरमन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आपल्या लाडक्या सरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक माजी विद्यार्थी या प्रसंगी एकत्र येणार आहेत.

​या उपक्रमाबद्दल बोलताना शाळेचे माजी विद्यार्थी राजू मसुरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, अल्ताफ खान सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान होते. समाजसेवेची आवड आणि शिस्त आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली. ईश्वराने त्यांना आमच्यापासून लवकर हिरावून घेतले ही वेदना मोठी आहे, पण या डिजिटल कक्षाच्या माध्यमातून त्यांचा आदर्श आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहतील. भविष्यातील विद्यार्थ्यांनी या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे, हीच आमची त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

​कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या या डिजिटल उपक्रमाचे आणि खान परिवाराच्या दातृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सोमवारी होणाऱ्या या सोहळ्याला सर्व माजी विद्यार्थ्यांनी आणि संबंधित स्नेह्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा