आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती; पत्रकार, कीर्तनकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
पाककला व वेशभूषा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी :
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना केसरकर यांनी नारायण राणे हे कोकणावर मनापासून प्रेम करणारे नेते असून केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचूनही त्यांची कोकणावरील माया कमी झालेली नाही, असे गौरवोद्गार काढले. या सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आमदार केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ महिला कीर्तनकार ललिता प्रभाकर तेली यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार दिव्या वायंगणकर, तरुण भारत डिजिटल मीडियाच्या अनुजा कुडतरकर, मितल धुरी आणि संवाद मिडिया न्यूज चॅनेलच्या ब्युरो चीफ विभावरी परब यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमांतर्गत आयोजित पाककला स्पर्धेत वीणा साटेलकर यांनी प्रथम, अनघा सावंत यांनी द्वितीय, तर साधना मोरे व करुणा कुमठेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण विभावरी परब यांनी केले. वेशभूषा स्पर्धेत चिमुकल्या नंदन कुमठेकर याने यश संपादन केले.
दिवसभरातील विविध उपक्रमांनंतर रात्री दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, शिवसेना नेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, राजन रेडकर, प्रेमानंद देसाई, राकेश पवार, स्नेहा नाईक, उत्कर्ष सासोलकर, सुप्रिता धाराणकर, शिवानी पाटकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
