You are currently viewing मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष ‘SIR’ मोहिमेला सिंधुदुर्गात सुरुवात

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष ‘SIR’ मोहिमेला सिंधुदुर्गात सुरुवात

नवीन मतदार नोंदणी, अपात्र नावे वगळणे व स्थलांतरितांची माहिती अद्ययावत करण्यावर भर

कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा – तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी :

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘Special Intensive Revision (SIR)’ या विशेष मोहिमेला १ एप्रिल २०२६ पासून सुरुवात झाली आहे. नव्या मतदारांची नोंदणी, अपात्र नोंदी वगळणे तसेच स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येत असून कुडाळ येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (BLO) प्रशिक्षण व आढावा बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, तहसिलदार सचिन पाटील, गणेश लव्हे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, या मोहिमेत देण्यात आलेली जबाबदारी सर्वांनी प्राधान्याने व यशस्वीरित्या पूर्ण करावी. मोहिमेचा नियमित आढावा घेतला जाणार असून कामात हयगय केल्यास केवळ नोटीस न देता थेट कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा