You are currently viewing मालवणात मच्छीमारांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आमदार निलेश राणेंची बैठक; डिझेल दर व जेटी उभारणीवर भर
Oplus_16908288

मालवणात मच्छीमारांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आमदार निलेश राणेंची बैठक; डिझेल दर व जेटी उभारणीवर भर

डिझेल ‘बल्क सेल’ वर्गीकरण रद्द करण्याची मागणी, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून मालवणात सुसज्ज जेटी उभारण्याचे आश्वासन

मालवण :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत डिझेल दरवाढीबाबत तसेच परताव्याच्या मुद्द्यावर निवेदन सादर करण्यात आले.

मच्छीमारांनी दिलेल्या निवेदनात डिझेलच्या “बल्क सेल” वर्गीकरणाला तात्काळ रद्द करून ते रिटेल अथवा सवलतीच्या दरात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच डिझेल परतावा (प्रतिपूर्ती) दर वाढवून तो त्रैमासिक पद्धतीने नियमित मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. “बल्क सेल” धोरणामुळे मच्छीमारांवर आर्थिक ताण वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, या विषयावर शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून मंत्री नितेश राणे यांनी केंद्र शासनालाही याबाबत पत्र पाठवले आहे. मच्छीमारांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत मच्छीमारांसाठी अधिक योजना समाविष्ट करून मालवण येथे सुसज्ज जेटी उभारण्याची मागणीही करण्यात आली. याबाबत लवकरच कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन देत आम्ही मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पेट्रोल-डिझेल वितरणाच्या सध्याच्या अडचणींबाबतही चर्चा झाली. कॅन किंवा बॅरलमधून वितरणास बंदी असल्याने मच्छीमारांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी स्तरावर तातडीने समन्वय साधून तोडगा काढण्याच्या सूचना आमदार राणे यांनी दिल्या.

या बैठकीनंतर मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त करत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा