*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री पल्लवी भट्टगावकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उठा राघवा*
उठा उठा राघवा रघुवरा अरुणोदय झाला
पूर्व दिशेला रविराजाने प्रकाश शिंपडला ||ध्रु||
सुस्वरे गाती सारे पक्षीगण जागे होऊनी
गोठ्यामधुनी गाय वासरे घेती हंबरूनी
शिवारातील पिके डोलती मंद वारा आला
पूर्व दिशेला रविराजाने प्रकाश शिंपडला ||१||
उठला भरत उठे लक्ष्मण उठ रामा आता
तरुवेलीही उठल्या बघ सांगे कौसल्या माता
आम्रतरुवर सुरेल स्वर हा कोकिल कंठी आला
पूर्व दिशेला रविराजाने प्रकाश शिंपडला ||२||
मंदिरातूनी घंटा नाद दूरवरी ऐकू येई
शंखांचाही मंगल ध्वनी कोणी ओवी गाई
पूजेला आणू कर्पूर धूप अन् मोगऱ्याच्या माळा
पूर्व दिशेला रविराजाने प्रकाश शिंपडला ||३||
*सौ. प्रांजली भट्टगावकर.*
*मीरारोड, मुंबई.*
