You are currently viewing ‘सिंधुसरस’ प्रदर्शनाचे कुडाळमध्ये भव्य आयोजन; महिला बचतगटांना बाजारपेठेची सुवर्णसंधी
Oplus_16908288

‘सिंधुसरस’ प्रदर्शनाचे कुडाळमध्ये भव्य आयोजन; महिला बचतगटांना बाजारपेठेची सुवर्णसंधी

२१ ते २५ मार्चदरम्यान विविध उपक्रमांची रेलचेल; स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

कुडाळ :

जिल्ह्यातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ‘सिंधुसरस’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २१ ते २५ मार्च दरम्यान कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील आमदार तसेच विविध प्रशासकीय अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा ग्रामीण यंत्रणा आणि ‘उमेद’ अभियानाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात एकूण ५९ स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बांबू उत्पादने, लाकडी खेळणी, कोकणी मेवा तसेच विविध हस्तकला वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील. विशेष आकर्षण म्हणून १६ महिला स्वयंसहाय्यता गटांचे खाद्यपदार्थ स्टॉल नागरिकांना चविष्ट पदार्थांची मेजवानी देणार आहेत.

तसेच शेतकरी आणि पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले असून विविध उपयुक्त माहिती देण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात दररोज वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खुले राहणार असून यात पैठणी स्पर्धा, डॉग शो, देवगड किंजवडे येथील प्रसिद्ध दशावतार नृत्य, बाळूमामांच्या जीवनावर आधारित नाटक, महिलांचे गट नृत्य तसेच ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

२५ मार्च रोजी या प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ होणार असून, या उपक्रमामुळे महिला बचतगटांना मोठी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा