You are currently viewing देवलीत महिला दिनानिमित्त वेशभूषा व नृत्य स्पर्धांचा रंगतदार सोहळा
Oplus_16908288

देवलीत महिला दिनानिमित्त वेशभूषा व नृत्य स्पर्धांचा रंगतदार सोहळा

पन्नासहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

वरची देवली / (प्रतिनिधी):

ग्रामपंचायत देवली आणि देवलीला ग्रामसंघ, वरची देवली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “रोजच्या रूटीन लाइफमधून बाहेर पडून साजरा करूया एक उनाड दिवस ‘ती’चा!” या संकल्पनेतून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम १५ मार्च रोजी प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी, मधला वाडा, वरची देवली येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून मालवणी मालिका, नाट्य व सिने अभिनेत्री मा. नमिता गावकर तसेच प्रथितयश नृत्यांगना व आहार-आरोग्य तज्ञ डॉ. गार्गी ओरोस्कर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. बक्षीस समारंभाच्या प्रारंभी देवलीला ग्रामसंघ आणि नवागर वाडीतील बचत गट सदस्यांनी स्वागतगीते सादर केली.

वेशभूषा स्पर्धेतील स्पर्धकांचे कौतुक करताना नमिता गावकर यांनी सादरीकरण करताना संवाद, हावभाव आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. पात्र साकारताना त्यामागील संकल्पना समजून घेतल्यास सादरीकरण अधिक प्रभावी होते, असे त्यांनी सांगितले.

समूह नृत्य स्पर्धेबाबत मार्गदर्शन करताना डॉ. गार्गी ओरोस्कर यांनी नृत्य करताना शारीरिक संतुलन, नियमित सराव आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहून वेळेवर आहार घेणे व पुरेशी झोप घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. देवली गावात सातत्याने होत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

या स्पर्धांमध्ये विविध वयोगटांतील पन्नासहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

वेशभूषा स्पर्धा – निकाल :

लहान गट (१ ते ७ वर्षे) : प्रथम – आदिश्री नाईक, द्वितीय – श्रीशा चव्हाण, तृतीय – तस्मय गोवेकर, उत्तेजनार्थ – वैदेही धुरी, गीतांश गोवेकर.

मध्यम गट (८ ते १५ वर्षे) : प्रथम – श्रावणी गणपत चव्हाण, द्वितीय – नुपूर मंगेश चव्हाण, तृतीय – शर्वरी सत्यवान गावडे, उत्तेजनार्थ – प्रणिता गुरुनाथ चव्हाण.

खुला गट (१५ वर्षे पुढे) : प्रथम – शोभा सुधीर चव्हाण, द्वितीय – वेदा वैभव चव्हाण, तृतीय – सीमा विलास चव्हाण, उत्तेजनार्थ – मंजुषा शामसुंदर मेस्त्री.

समूह नृत्य स्पर्धा – निकाल :

लहान गट (५ ते १० वर्षे) : प्रथम – ‘बाई पण भारी देवा’ (युती मेस्त्री, आर्या मेस्त्री, अनुष्का मेस्त्री, रूची सांडव), द्वितीय – ‘आम्ही शिवकन्या’ (प्रणिता, वेदी, श्रावणी आणि खुशी चव्हाण), तृतीय – ‘दिल है छोटासा’ (आद्या चव्हाण, श्रीशा चव्हाण, श्रावणी श्रीधर चव्हाण).

खुला गट (११ वर्षे पुढे) : प्रथम – कोळी नृत्य (मधुरा गोवेकर, संचिता गोवेकर), द्वितीय – दिंडी नृत्य (गार्गी चव्हाण, समीक्षा चव्हाण, गायत्री चव्हाण, मेघाली, शोभा चव्हाण, वेदी, श्रावणी, खुशी, प्रणिता, काव्या, हर्षिका).

वैयक्तिक नृत्य – लहान गट :

प्रथम – श्रावणी गणपत चव्हाण, द्वितीय – वेदी गोविंद चव्हाण, तृतीय – आराध्या वैभव चव्हाण.

कार्यक्रमात उपस्थित महिलांनी व बालकांनी उत्स्फूर्तपणे गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच देवलीला ग्रामसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि विविध गटप्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर डॉ. सुमेधा नाईक, वाघवणे पोलीस पाटील गौरी चव्हाण, माजी सरपंच गायत्री चव्हाण, सीआरपी मंजुषा मेस्त्री, देवलीला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मधुरा महेश गोवेकर, अ‍ॅड. रुपेश आळवे तसेच देवलीचे सरपंच श्याम वाक्कर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुरा गोवेकर यांनी केले. वेदा चव्हाण आणि डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवलीला ग्रामसंघाच्या सर्व सदस्यांनी तसेच प्रिया नरेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा