*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवणच्या आजीव सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम लावणी*
*आला सण होळी*
*(गीत प्रकार लावणी )*
फाल्गुनाच्या पौर्णिमेला आला वर्षाचा सण होळी
तुमच्यासाठी केली गोड गोड पुरणाची पोळी ॥धृ ॥
हिरवा भरजरी शालू नेसुनी उभी राहिले दारी
रंगांचा खेळ खेळण्या ऐटीत आली स्वारी
नजरेच्या बंदुकीची घुसली काळजात गोळी
तुमच्यासाठी केली गोड गोड पुरणाची पोळी ॥१ ॥
पिरमाच्या रंगाची सख्या मारुया पिचकारी
दंग होऊनी चिंब भिजुया इश्काच्या दरबारी
जीव जडला तुमच्यावरती वेडावली भोळी
तुमच्यासाठी केली गोड गोड पुरणाची पोळी॥ २ ॥
पिरतीचे नाजूक बीज हृदयात कसे रुजले
गाल फुगवूनी मन माझे तुमच्यावर रुसले
राग लोभ मत्सराची पेटवुया आज होळी
तुमच्यासाठी केली गोड गोड पुरणाची पोळी ॥ ३ ॥
*✒️© सौ आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
