You are currently viewing वेंगुर्ल्यात १० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात होणार साजरा 

वेंगुर्ल्यात १० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात होणार साजरा 

वेंगुर्ल्यात १० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात होणार साजरा

“सक्षमीकरणातून परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धा व महिलांचा गौरव

वेंगुर्ला

वेंगुर्ला नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती तर्फे दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महिलांच्या सर्वांगीण सशक्तीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे तसेच स्त्रीशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
कार्यक्रमाची संकल्पना “सक्षमीकरणातून परिवर्तन” या विचारांवर आधारित असून महिलांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि यशोगाथांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे.
विशेष समूह नृत्य स्पर्धा
या दिनानिमित्त महिलांसाठी विशेष समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी एकूण १५ प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून प्रत्येक गटात किमान ४ महिलांचा सहभाग अनिवार्य आहे.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत:
“एक स्त्री – अनेक रूपे”
“सक्षमीकरण आणि विविधता”
“नारी शक्तीचा गौरव”
“स्त्री जीवनाचे विविध रंग”
प्रत्येक सादरीकरणासाठी ५ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹५,०००/-, ₹३,०००/- व ₹२,०००/- इतकी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
वेशभूषा स्पर्धेचे आयोजन
महिलांसाठी “स्वच्छता अनुसरून विषय आणि स्त्री शक्ती” या संकल्पनेवर आधारित विशेष वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता अभियानात योगदान देणाऱ्या तसेच समाजपरिवर्तन घडविणाऱ्या महिलांचे विविध रूपांत सर्जनशील सादरीकरण या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठीही १५ प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹५,०००/-, ₹३,०००/- व ₹२,०००/- अशी रोख पारितोषिके देण्यात येतील.
वेंगुर्ला शहरातील सर्व महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महिला सशक्तीकरणाच्या या प्रेरणादायी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा ९१३००४८१०२ या क्रमांकावर संपर्क करावा.
हे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे व विभाग प्रमुख निशा आळवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा