उत्तम फोंडेकर यांना ‘लोकमंगल कृषी’ पुरस्कार प्रदान
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुंभारमाठ मधील प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना कोकण विभागातून महाराष्ट्र शासनाचा ‘लोकमंगल कृषी’ पुरस्कार सोलापूर वडाळा येथे लोकमंगल सभागृहात सोलापूरचे आमदार सन्मानीय शिवाजीबापू देशमुख यांच्या हस्ते आणि जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ पद्मश्री श्रीरंग लाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ, सन्मान चिन्ह, आणि तीस हजारचा धनादेश देऊन प्रदान करण्यात आला.
पाच वर्षे प्रथम हापूस आंब्याची पेटी मार्केट मध्ये आणल्याबद्दल आणि जागतिक स्तरावर लाल शेवग्याची निर्मिती केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे मालवण कृषी अधिकारी किशोर कदम यांनी सांगितले. जगातील शास्त्रज्ञ आणि संशोधक शेवग्याचा लाल रंग करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना न जमलेले कार्य उत्तम फोंडेकर यांनी केल्यामुळे त्यांचे कार्य वाखान्याजोगे असल्याचे तसेच त्यांना मिळालेले लाल शेवग्याच्या पेटंटचे अधिकार देशातील बी-बियाण्यांच्या कंपनीला दिल्यास पंच्याहत्तर लाख किंवा परदेशी कंपनीला दिल्यास एक कोटी किंमत असल्याचे कृषी अधिकारी सखाराम पवार यांनी सांगितले. पत्रकारांनी फोंडेकर यांना पुरस्काराबद्दल विचारताच फोंडेकर यांनी हापूस क्षेत्रात मालवण मधील लुडबे, गावकर,गांगनाईक, करलकर, वायरीतील चव्हाण आणि इतर अनेक बागायतदारांनी या क्षेत्रात यश मिळवून महाराष्ट्रभर त्यांची कीर्ती पसरली आहे. त्यांच्याच प्रेरणेने आणि आशिर्वादामुळे मला कृषी क्षेत्रात यश लाभले. असे उत्तम फोंडेकर यांनी सांगितले.
