कणकवलीत मराठा मंडळ नाट्यगृह, आर्ट गॅलरी व सभागृहाचे भूमिपूजन; मंत्री नितेश राणे यांचा निवडणूक शब्द पूर्ण
कणकवली
कणकवली येथे मराठा मंडळ नाट्यगृह, प्रशस्त आर्ट गॅलरी आणि सभागृह या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. मंत्रीमहोदयांचे पी.ए. सर्वगौड साहेब, महेश सावंत यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करत मंत्री नितेश राणे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ केला. मराठा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णीही यावेळी उपस्थित होते. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “मंत्र्यांनी केलेले काम भूषणावह आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून केली. त्यानंतर भूमिपूजन करून त्यांनी मराठा मंडळाच्या कार्याचा आणि प्रकल्पाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा उपस्थितांना दिला.
या प्रकल्पामध्ये बेसमेंटला पार्किंग सुविधा, अत्याधुनिक नाट्यगृह, त्यावरील मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आर्ट गॅलरी आणि त्यावर प्रशस्त सभागृह अशी रचना असणार आहे. नाट्यगृह, गॅलरी आणि सभागृह वातानुकूलित असतील. त्यामुळे मुंबई-पुण्यातील नामांकित नाटके, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आता कणकवलीतही आयोजित करता येणार आहेत.
परिसरात सुशोभित बाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कणकवली शहर पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित होऊन जागतिक नकाशावर आपले स्थान निर्माण करेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
— अजित नाडकर्णी, शुभांजित सृष्टी
