You are currently viewing ती ओळखीची…अनोळखी

ती ओळखीची…अनोळखी

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ती ओळखीची…अनोळखी*

 

ती रोज दारात उभी राहायची,

कुतूहलाने बघायची,

आनंदाने भरलेली एक हास्यछटा

तिच्या गालांवर तरंगायची.

 

तिच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव

तिला स्वप्नं दाखवायचे,

आणि ती वास्तवात आल्यावर

पावलं तिची घराकडे वळायचे

 

पुन्हा कुठेतरी दुसरीकडे

लग्नमंडपाबाहेर उभी राहायची,

क्षणभर त्या प्रसंगी ती नवरी व्हायची,

मिष्कील हसू चेहऱ्यावर आणून

उष्ट्या पत्रावळीतलं गोडधोड

मळक्या पिशवीत भरून घ्यायची.

 

असा प्रसंग तिच्या आयुष्यात

कधीच येणार नव्हता,

हे तिला माहीत होतं, तरीही

खोटं सुख पांघरून वावरणारे माणसं

तिच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद पाहायचे

आणि त्या गर्दीतून तिला हाकलून लावायचे.

 

पण भूक तिला छळायची,

उष्ट्या अन्नासाठी पळायची,

स्वप्नांना घट्ट मिठी मारून

कुणाच्यातरी लग्नाची मिठाई

घरच्या पंगतीत बसून खायची.

 

तिचा दिनक्रम चुकायचा नाही,

ती पुन्हा आणखी कुठेतरी जायची,

लग्नमंडपाच्या बाहेर उभी राहून

ओंजळीत स्वप्नं गोळा करून घ्यायची.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा